Marathi Actress Girija prabhu : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने जवळपास चार वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला होता. यामधील गौरी-जयदीपची जोडी सर्वांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या भूमिका अनुक्रमे गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी साकारल्या होत्या. या मालिकेनंतरही गिरीजा-मंदार म्युझिक व्हिडीओ आणि स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेच्या निमित्ताने एकत्र झळकले होते. आता अभिनेत्री गिरीजा प्रभूने शेअर केलेल्या काही फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून गेतलं आहे.
गिरीजाचा जन्म गोव्यात झाला. त्यानंतर ती पुण्यात लहानाची मोठी झाली. तिने पुण्यातच शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर गिरीजा कामासाठी मुंबईत आली आणि तिचा सिनेविश्वातील प्रवास सुरू झाला.
त्यामुळे गणपतीच्या सणाला खास सुट्टी घेऊन गिरीजा आपल्या मूळ गावी गोव्याला गेली होती. गोव्यातील सुंदर निसर्गरम्य वातावरण, नारळ-सुपारीच्या बागा, रानात आलेली रंगीबेरंगी फुलं, ताज्या भाज्या, कौलारू घर, गावचा पारंपरिक गणेशोत्सव याची झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

‘माझं गाव गणपती २०२६’ असं कॅप्शन गिरीजाने या फोटोंना दिलं आहे. बाप्पासाठी सुद्धा अभिनेत्रीने अगदी घरच्या घरी सुंदर सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय काही फोटोंमध्ये गिरीजाचा ‘नो मेकअप’ लूक दिसतोय.

दरम्यान, गिरीजा आता फक्त २६ वर्षांची आहे. कमी वयातच तिला मोठं यश मिळालं आहे. सध्या ती हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आता अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा कमबॅक केव्हा करणार, ती सिनेमांमध्ये झळकणार का? याबाबत तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
