बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यापैकीच एका खास नात्याचा उलगडा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान झाला आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील समरची आजी म्हणजेच अभिनेत्री सुलभा आर्य या नात्याने शबाना आझमी यांच्या वहिनी आहेत. अवॉर्ड सोहळ्यात शबाना यांनी स्वत: या नात्याबद्दल खुलासा केला आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सुलभा आर्य यांनी त्याकाळी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. सुलभा आर्य यांचे पती ईशान आर्य हे मुस्लीम होते.
शबाना आझमी या दिवंगत कवी कैफी आझमी यांच्या कन्या आहेत. ईशान आर्य यांची आई शबाना आझमींच्या वडिलांची बहीण होती. म्हणजेच ईशान आर्य हे शबाना यांच्या आत्याचे चिरंजीव होते. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात लाडक्या वहिनीचं कौतुक करण्यासाठी खास शबाना आझमी स्वत: आल्या होत्या.
शबाना आझमी उपस्थित सर्वांना म्हणाल्या, “नमस्कार, मी शबाना आझमी आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल पण, सुलभा आर्य ( ये मेरी भाभी है ) या नात्याने माझ्या वहिनी आहेत. आमच्या कुटुंबात नेहमीच सर्वांचं कौतुक केलं जातं, विशेषत: दुसऱ्या मंडळींचं पण, घरातल्या कुणाला अवॉर्ड मिळत असेल तर आमचं असं असतं, ठिक आहे ‘घर की मुर्गी दाल बराबर’. खरंतर असं करायला नाही पाहिजे…त्यामुळेच आज मला इथे प्रत्यक्ष पाहून सुलभाजी सुद्धा नक्कीच खूश झाल्या असणार हे मला माहिती आहे. आता बरीच वर्ष आपल्या नात्याला झाली आणि या काही वर्षात मी तुमच्याशी जर कधी भांडली असेन, तर मी तुमची माफी मागते आणि आज तुमचं खूप-खूप कौतुक करते. मला तुमचा मनापासून खूप जास्त अभिमान आहे.”
सुलभाजी विंगेत बसून रडत होत्या…
“सुलभाजींबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगेन, त्यांचे एका मिनिटांत सगळे संवाद पाठ होतात. स्क्रिप्ट आली की, त्या रेडीच असतात आणि अनेक कलाकारांना त्यांची ही सवय माहिती आहे. पण, ‘शो मस्ट गो ऑन’ नेमकं काय असतं हे मला त्यांना पाहून समजलं. यांचा मुलगा सागर साडेतीन किंवा चार वर्षांचा असेल. तेव्हा तो माझ्याबरोबर एका नाटकात काम करायचा आणि माझ्या मुलाची भूमिका साकारत होता. त्यादिवशी त्याला १०३ ताप होता. त्यावेळी सुलभाजी विंगेत बसून रडत होत्या, सागरला उठताही येत नव्हतं. त्याच क्षणाला त्या मायेने आंजारत-गोंजारत त्याला म्हणत होत्या, ‘प्लीज! बेटा स्टेजवर पाच मिनिटं जा…’ त्या साडेतीन वर्षांच्या मुलाला सांगत होत्या, ‘द शो मस्ट गो ऑन’!”
दरम्यान, शबाना आझमी यांनी सांगितलेला किस्सा ऐकून सर्वांचे डोळे भरून आले होते. शबाना आझमींच्या उपस्थितीत सुलभा आर्य यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालिकेतील सहकलाकार म्हणजे सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांनीही त्यांचं कौतुक केलं.
