Sulekha Talwalkar shares her food preferences : सुलेखा तलवळकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहेत. सुलेखा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि यामार्फत त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्या शेअर करत असतात. 

सुलेखा तलवळकर अनेकदा मुलाखतींमधून त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडींबद्दल बोलताना दिसतात. तलवळकर कुटुंबीयांना मांसाहार करायला खूप आवडतो त्यामुळे त्यांच्या घरात विविध पद्धतीचे मासे आणि इतर पदार्थ बनत असतात असंही त्या सांगताना दिसतात. अशातच आता त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना काय खायला आवडतं, त्या काय खाणं टाळतात याबद्दल सांगितलं आहे.

सुलेखा तलवळकर यांना आवडतो मांसाहार

मुलाखतीत त्यांनी “मला नॉन व्हेज बनवायला खूप आवडतं, व्हेज जेवणापेक्षा. मला तेच खायलासुद्धा आवडतं.” असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या सासू दिवंगत अभिनेत्री स्मिता तलवळर यांनी त्यांना मॅश पोटॅटो हा पदार्थ बनवायला शिकवलं होतं असंही म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, “मला पोळी आवडत नाही. मी खूप भात खाते. मला आणि माझ्या नवऱ्याला भात खूप आवडतो आणि मुलांना पोळ्या आवडतात.”

पापड आणि लोणचं कधीच खात नाही

सुलेखा यांना पुढे पापड आणि लोणचं सगळ्यात जास्त कोणाला आवडतं असं विचारल्यानतंर त्या म्हणाल्या, “आधी असायचं आता नाहीये. पापड आणि लोणचं खरंतर आपल्यासाठी फार चांगलं नसतं. पापडात त्याचा खार असतो आणि लोणच्यामध्येसुद्धा खार असतो. त्यामुळे ते ब्लड प्रेशरसाठी चांगलं नसतं म्हणून आम्ही नाही खात.” यावेळी त्यांना मालिका सुरू नसतात तेव्हा त्या स्वयंपाकघरात असतात आणि त्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतो असं म्हटलं आहे.

सुलेखा यांनी यावेळी त्यांना तिखट खायला खूप आवडतं असं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मला माझ्या नवऱ्याला आणि मुलीला तिखट खायला खूप आवडतं. पण, माझ्या मुलाला आवडत नाही. तो नसला की आम्ही खूप तिखट खातो.”  मुलाखतीत सुलेखा यांना पुढे त्यांच्या सासूबाई स्मिता यांचा आवडता पदार्थ कोणता होता असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “त्यांना एक खूप वेगळा पदार्थ आवडायचा. आपण पोहे करतो ना? त्या त्यामध्ये वांगी घालायच्या. लाल पोहे करायच्या. खूप छान लागायचं ते. त्यात भरपूर कांदा सगळं अगदी पोहे करतो तसचं करायच्या.”