Sumeet Raghavan Emotional Post for Wife Chinmayee: मराठी चित्रपटसृष्टीत अशी अनेक नामांकित जोडपी आहेत, जे कामानिमित्त भेटले आणि एकत्र काम करत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. कित्येक वर्षांपासून ते एकमेकांबरोबर सुखाचा संसार करत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत. सुमीत व चिन्मयी अनेकदा एकमेकांबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता सुमीतने पत्नीबरोबरचे खास फोटो शेअर करत कौतुक केले आहे.
सुमीत राघवन मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तर चिन्यमीनेसुद्धा आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दोघेही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि अनेकदा यामार्फत कुठल्याही मुद्द्याबद्दलची त्यांची मते, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता सुमीत यांनी पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
सुमीत राघवन पत्नीबद्दल काय म्हणाला?
सुमीतने चिन्मयीबरोबरचे जुने फोटो शेअर केले आहेत. त्याने यावेळी त्यांच्या लग्नातील कार्यक्रमाचे जुने आणि गोड फोटो शेअर केले आहेत. या फोटांना त्याने खास कॅप्शनही दिली आहे. त्यामधून त्याने “आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या कष्टांमुळे नाही, तर आजवर मला ज्या ज्या सुहृद, मित्रांनी, आप्तेष्टांनी वेळोवेळी मदत केली त्यांच्यामुळे. हसणारा, हसवणारा, जिंदा दिल सुमीत कसा आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण, कधीतरी हळवा कातर होणारा, रागावणारा, रुसणारा सुमीत कसा दिसतो हे फक्त एकाच व्यक्तीला माहीत आहे. माझी अतिशय आवडती, कधीही आंधळा विश्वास ठेवता येईल अशी, आदर आणि प्रेम दोन्ही देणारी… आधी माझी लाडकी मैत्रीण आणि मग प्रेयसी व मग बायको… चिन्मयी!” असं म्हटलं आहे.
सुमीत यामधून पुढे म्हणाला, “३५ वर्षांपूर्वी नाटकाच्या तालमीत झालेल्या भेटीपासून ते आता इतक्या वर्षांनी एकत्र नाटक करण्यापर्यंत आलेला प्रवास ह्या माझ्या बेस्ट फ्रेंडमुळे सुखकर आणि रम्य झाला. तुमचाही असेल ना एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण… असेल तर आवर्जून सांगा, आजवर कधीही त्याला किंवा तिला सांगितलं नसेल, तर नक्की सांगा, कारण… मैत्री टिकवायची असेल, तर अधूनमधून सांगावं लागतं…”
सुमीतच्या या पोस्टखाली मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. तर त्यांच्या चाहत्यांनीही लाइक व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, सुमीतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच त्यांची सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. चुंबक या सीरिजमधून तो पहिल्यांदाच नेटफ्लिक्सवर झळकणार असल्याचे त्याने पोस्टमधून म्हटले आहे.
