Sumeet Raghavan On Fitness Secret: सुमीत राघवन यांनी मराठी, हिंदी मालिका, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक मालिका, भूमिका गाजल्या आहेत. सध्या त्यांचे ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक चांगलेच गाजत आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी चिन्मयी सुमितदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सुमित राघवन हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते. विविध विषयांवर ते त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. ५५ वर्षीय सुमीत राघवन यांच्या फिटनेसची वेळोवेळी चर्चा होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसबद्दल वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणालेत, याबद्दल जाणून घेऊया…
सुमीत राघवन नेमकं काय म्हणाले?
सुमीत राघवन यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांचे फिटनेसचे काय सिक्रेट आहे, असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले, “या फिटनेसचे रहस्य घरचं जेवण आहे. घरचं जेवावं आणि कधीतरी एखादा बटाटावडा चोरून खावा.”
पुढे ते असेही म्हणाले, “माझे वडील शिडशिडीत आहेत. त्यामुळे बहुतेक हे वडिलांकडून आलेलं आहे. पण, नट म्हणून तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. जीभेवर ताबा ठेवावा लागतो.” ते असेही म्हणाले, “जीभेवर २४ तास ताबाच ठेवायला हवा. कारण-हल्ली तुम्ही काही बोललात तर तुमची खैर नाही. खाण्याच्या बाबतीत असो किंवा बोलण्याच्या बाबतीत असो, जीभेवर ताबा फार महत्त्वाचा आहे.ठ
सुमीत राघवन याच मुलाखतीत ९ व्या वर्षी महाभारतात काम करण्याबद्दलही सांगितले. त्यावेळी टेलिव्हनजचे हे दिवस स्वप्नवतच होते. मी हे अनुभवलं आहे. ‘बुनियाद’, ‘ये जो है जिंदगी’, महाभारत, रामायण या मालिका जेव्हा टेलिव्हिजनवर लागायच्या, त्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असायचा. बुनियादचा शेवटचा एपिसोड होता, त्यावेळी लाईट गेली, म्हणून तो एपिसोड रीटेलिकास्ट केला. त्यावेळी टेलिव्हिजन असं होतं.
बी आर चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता. मी लहान असलो तरी ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचे, वागायचे, शूटिंगवेळी त्यांनी माझी खूप काळजी घेतली, अशी माणसं आता राहिली नाहीत, असेही सुमीत राघवन म्हणाले.
