Sumona Chakravarti Endometriosis : कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी हे पात्र साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती काही काळापासून सिनेविश्वापासून लांब आहे. कोणत्याही शोमध्ये किंवा चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारलेली नाही. सोशल मीडियावरही कोणतीही अपडेट शेअर करत नसल्याने सुमोनाच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. अखेर तिने सोशल मीडियावर पोस्ट करीत ती प्रसिद्धीपासून लांब का गेली, याचे कारण सांगितले आहे. नुकतीच एका आजारातून बाहेर आली असून, त्यामुळे तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतल्याचे सुमोना चक्रवर्तीने सांगितले आहे.

सुमोना चक्रवर्ती ही मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सुमोना अचानक काही महिने कोणतेही अपडेट शेअर करीत नव्हती. आज अखेर तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. नुकतीच तिची ‘एंडोमेट्रिओसिस’ (endometriosis) शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती स्वतः दिली आहे. तिने लिहिले, “खूप दिवसांनंतर पुन्हा समोर येत आहे, याचा आनंद आहे. दोन महिन्यांपासून जगापासून जरा अलिप्त राहिले होते. जाणीवपूर्वक सोशल मीडियापासून दूर राहिले. याचे कारण म्हणजे ४ मे रोजी एंडोमेट्रिओसिस काढून टाकण्यासाठी माझी एक शस्त्रक्रिया झाली. वर्षानुवर्षे या आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करूनही दुर्दैवाने तो मोठ्या प्रमाणात वाढला होता.”

हे काही प्रसिद्धी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी नाही, तर – सुमोना

ती पुढे म्हणाली, “दोन महिनांपासून शारीरिक व मानसिकदृष्ट्या यांतून सावरण्याचा प्रयत्न करत होते. आज प्रामाणिकपणे सांगू शकते की, मी बरी आहे.” सुमोनाने बरे होण्याचे श्रेय रुग्णालयातील डॉक्टरांना दिले; उपचार केल्याबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांना ‘देवदूत’ (angels) असे म्हणाली आहे. “मी त्यांची सदैव ऋणी राहीन,” असेही सुमोनाने नमूद केले. पुढे तिने लिहिले, “हे काही प्रसिद्धी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी नाही, तर या अनुभवामुळे माझ्या जीवनामध्ये आणि तो जगण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला हे सांगण्यासाठी लिहित आहे.”

सुमोना चक्रवर्तीने लिहिलं, “व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम पूर्णपणे डिलीट करण्याच्या विचार करत होते, पण तसे करणे कामासाठी योग्य नसल्याचे लक्षात येईपर्यंतचा हा प्रवास आहे. मी काही आताच निवृत्त होऊन डोंगराळ भागात राहायला जाणार नाहीये. माझं काम, कुटुंब, मित्र-मैत्रिणी आणि माझं आयुष्य हे सगळं इथेच आहे. मात्र, मला एक गोष्ट नक्की ती म्हणजे सोशल मीडिया वापरण्याची माझी पद्धत बदलायची आहे. ‘लाइक्स’, ‘कमेंट्स’ किंवा ‘फॉलोअर्स’च्या संख्येच्या मागं धावणं मला कधीच आवडलं नाही. त्याऐवजी मला एकसारखी विचारसरणी असलेले लोक विशेषतः स्त्रियांची एक कम्युनिटी तयार करायला जास्त आवडेल.”

अशी एक कम्युनिटी असली पाहिजे – सुमोना

पुढे तिनं लिहिलं, “एक अशी जागा पाहिजे, जिथे आपण शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, पेरीमेनोपॉज (रजोनिवृत्तीपूर्व काळ), एंडोमेट्रिओसिस, प्रवासाच्या गोष्टी, भेटी दिलेली किंवा द्यायची असलेली ठिकाणे, मी वाचलेली पुस्तके, झाडे-वेली, पाळीव प्राणी, खाद्यपदार्थ, तसेच अविवाहित राहणे, स्वावलंबी असणे, मुलं नको असण्याचा निर्णय घेणे किंवा ‘DINK’ (दोघेही कमावते पण मुले नाहीत) जोडपे असणे, अशा विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा करू शकू. हे फक्त माझ्या मनातील विचार असून ते मी इथे मांडत आहे; त्यांची अंमलबजावणी नक्की कशी करायची, हे मी ठरवलेलं नाही.”

सुमोना ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

सुमोना चक्रवर्ती ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नी मंजू शर्माच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या या भूमिकेमुळे सुमोना हिला घराघरात ओळख मिळवून दिली आहे. तिने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये हे प्रभावी पात्र साकारले होते. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये झळकली होती. तिने ‘बर्फी’ या रणबीर कपूर स्टाटर चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.