स्टार प्रवाहवर ‘सुना येती घरा’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची कथा उलगडणार आहे. ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आहे.

यामुळेच आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो. मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर घरात सुख-समृद्धी नांदते की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो? याचं भावनिक आणि रंजक चित्रण मालिकेतून पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या नव्या मालिकेविषयी सांगताना अशोक शिंदे म्हणाले, “स्टार प्रवाहबरोबरची माझी ही नववी मालिका. पुन्हा या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माणसं जपणारा, कुटुंबवत्सल अशा शिवनाथचं पात्र मी साकारणार आहे. आपलं कुटुंब पाठीशी असेल तर जगातली कोणतीही लढाई जिंकता येते असा त्याचा ठाम विश्वास आहे. त्याची मुलं म्हणजे त्याचा अभिमान. त्यांच्यावर त्याचा जीव आहे. त्यांना चांगलं वळण मिळावं म्हणून तो कठोरही वागतो, पण मनात कायम काळजी आणि प्रेम आहे. भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल.”

Ashok shinde
अशोक शिंदे

दीपा परब छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहची ही तिची पहिलीच मालिका आहे. उमावती या भूमिकेविषयी सांगताना दीपा म्हणाली, “मालिकेची गोष्ट आणि पात्र ऐकताक्षणीच मला भावलं. उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. आई आणि पत्नीची कर्तव्यं ती पूर्णपणे जाणते. वडील आणि मुलांमधला संवेदनशील पूल म्हणून ती स्वतःकडे पाहते. प्रचंड श्रीमंतीत वाढूनही तिने शिवनाथबरोबर शून्यातून कष्ट करून संसार उभा केला. प्रेक्षकांनाही या मालिकेत स्वतःचं घर दिसेल याची खात्री आहे.”

तर, शर्मिष्ठा राऊत म्हणाली, “पुन्हा एकदा खलनायिका साकारतेय. पद्मावतीचा वेगळा दरारा आहे. कपटीपणा तिचा स्थायी स्वभाव आहे. आपली श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे, हा तिचा अट्टहास असतो. बोलताना ती कुणाची पर्वा करत नाही; समोरच्याला काय वाटेल याचा विचारही करत नाही. जवळपास ३ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतेय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे.”

दरम्यान, आता ‘सुना येती घरा’ या मालिकेला कोणता टाइम स्लॉट मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल. तसेच लवकरच या मालिकेची लॉन्च तारीख अन् वेळ वाहिनीकडून अधिकृतरित्या जाहीर केली जाईल.