Sundara Manamadhe Bharli Fame Actress Akshaya Naik : छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर काही वर्षांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रसारित केली जायची. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता समीर परांजपे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हटके विषय असल्याने या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दोन वर्षे अधिराज्य गाजवल्यावर २०२३ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, आजही या मालिकेच्या आठवणी सर्वांच्या मनात ताज्या आहेत. अभिनेत्री अक्षया नाईक या मालिकेत लतिका जहागिरदार ही भूमिका साकारत होती.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका संपल्यावर अक्षयाने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. मात्र, आता दोन वर्षांनी अभिनेत्री कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.
अक्षया नाईकची ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. यामध्ये अभिनेत्री वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या एन्ट्रीची पहिली झलक अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “२ वर्षांनंतर परत एकदा येतेय तुमच्या भेटीला… सन मराठी वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेमध्ये मी एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.”
मालिकाविश्वात कमबॅक करणार ही अक्षयाची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुकन्या मोने, ऋतुजा बागवे, आकांक्षा गाडे या अभिनेत्रींनी अक्षयाला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अक्षया नाईक एन्ट्री घेतलेली असलेली ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत मोनिका राठी आणि वैभव कदम प्रमुख भूमिका साकारत आहेत. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अक्षयाच्या एन्ट्रीनंतर मंजूच्या आयुष्यात काय वादळ येणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.