मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हिंदी मालिका, रिअ‍ॅलिटी शो, हिंदी सिनेमे गाजवताना दिसतात. अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, मानसी साळवी, राकेश बापट, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट यांसारखे अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत अनेक नवनवीन हिंदी प्रोजेक्ट्समध्ये झळकले आहेत. अमृता खानविलकरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तस्करी’ सीरिजचं सुद्धा सर्वत्र भरभरून कौतुक झालं. याच ‘तस्करी’मध्ये अमृतासह आणखी एका मराठी अभिनेत्री झळकली होती ती म्हणजे अक्षया नाईक.

अक्षया नाईकने आजवर मराठी नाटक, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी मालिका विश्वातील ‘सुंदरा’ म्हणून तिला ओळखलं जातं. कारण, अक्षयाने ‘कलर्स मराठी’च्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. याशिवाय अक्षयाने नुकत्याच ‘तस्करी’मध्ये साकारलेल्या भूमिकेचं सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे. आता अभिनेत्रीने तिच्या तमाम चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षया आता पुन्हा एकदा हिंदी मालिकेत झळकणार आहे.

खरंतर, अक्षयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘अँड टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

अक्षया महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असलेल्या मालिकेचं नाव आहे ‘हे भगवान कितना बदल गया इंसान’. या आगामी मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. लवकरच याबद्दलची अपडेट अभिनेत्री शेअर करेल. अक्षयाने तिच्या करिअरची सुरुवातच सुद्धा हिंदी मालिकेतून केली होती. यानंतर पुढे मराठी मालिका मग ओटीटी असा तिचा प्रवास दमदारपणे सुरू आहे.

अक्षया या मालिकेबद्दल सांगते, “या नव्या मालिकेसाठी खरंतर मी खूप उत्सुक आहे. टेलिव्हिजन करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की, एक कलाकार म्हणून रोज त्या कलेचा सराव होत असतो आणि कुठेतरी मी माझ्या आयुष्यात हे रूटीन मिस करत होते. आता या मालिकेमुळे पुन्हा रोज काम करत राहण्यातली मजा अनुभवायला मिळेल अशी आशा आहे. या मालिकेच्या निमित्ताने नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय याचा आनंद देखील वेगळा आहे.”