Sunil Lahri Praises IAS Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्तपद स्वीकारून १०० दिवस झाले असून, त्यांच्या कारवायांमुळे ते सर्वत्र चर्चेत आहेत. अन्नपदार्थांची सुरक्षा आणि भेसळीविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी अगदी अनेक कॅन्टीनवरही त्यांनी धाडी टाकल्याने सर्वसामान्यांना सुरक्षित अन्न मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाला बॉलीवूड आणि मालिकाविश्वातून मोठा पाठिंबा दिला मिळतोय.
‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत त्यांनी मुंढेंनी अन्नसुरक्षेसाठी केलेल्या कारवायांना पाठिंबा दिला. या कामासाठी सुनील यांनी तुकाराम मुंढे व महाराष्ट्र सरकारला सलाम केला आहे.
या कंपनीच्या नाकीनऊ आणलेत – सुनील लहरी
सुनील लहरी म्हणाले, “आज मी तुमच्यासमोर, अशा व्यक्तीबद्दल बोलतोय, ज्यांनी आपल्या देशात आणि खासकरून महाराष्ट्रात रस्त्यावरील खाऊ-गल्ल्यांपासून मोठमोठ्या फूड चेनपर्यंत अगदी सरकारी कॅन्टीन, अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या नाकीनऊ आणले आहेत. मी कोणाबद्दल बोलतोय, हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल.”
पुढे ते म्हणाले, “या व्यक्तीबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल आणि वाचले असेल. मी महाराष्ट्राच्या FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बोलतो आहे. मी त्यांना व महाराष्ट्र सरकारला सलाम करतो. कारण- सरकार त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. आपल्याला पूर्ण देशात प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक विभागात जर तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक, समर्पित आणि कटिबद्ध असे आयुक्त असतील, तर लवकरच आपला देश पुन्हा एकदा सोन्याचा धूर येणारा देश होईल.”
पुढे सुनील लहरी म्हणाले, “असे आयुक्त असतील, तर प्रत्येकाला स्वच्छ व भेसळमुक्त अन्न मिळेल आणि सर्व जण आरोग्यसंपन्न आणि शारीरिकदृष्ट्या समृद्ध राहतील. जर आपल्याला असे काम हवे असेल, तर आपण एकजूट होऊन प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये असे अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली पाहिजे.”
तुकाराम मुंढे यांचे FDA आयुक्तपद स्वीकारून १०० दिवस पूर्ण
दरम्यान, तुकाराम मुंढे यांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारून १०० दिवस पूर्ण झाले असून, या काळामध्ये एफडीएच्या पथकांनी ९०४ ठिकाणी छापे मारले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये ३४.७ कोटी किमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले आहे. या उत्पादनांमध्ये बनावट चीज, भेसळयुक्त दूध, चुकीचे लेबल लावलेले खाद्य तेल आणि हानिकारक कृत्रिम रंगांचा समावेश होता. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळलेल्या ३२२ आस्थापना सील करण्यात आल्या.
