Sunil Tawade on Sagar Karande and Bhau Kadam: सागर कारंडे सध्या ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्याच्या खेळाची चांगलीच चर्चा झाली. एक व्यक्ती म्हणून सागर या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही तो विविध मुलाखती आणि सोशल मीडिया या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आता सागर कारंडे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेते सुनील तावडेंनी एका मुलाखतीत त्याच्याबद्दल वक्तव्य केले आहे. सुनील तावडे यांनी आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, तुम्हाला स्कीटमध्ये सगळ्यात जास्त कुठला जोडीदार चांगला वाटतो? यावर सुनील तावडे म्हणाले, “सागर कारंडे. तो मला मुलासारखाच आहे. तो मला पप्पाच म्हणतो. त्याच्याबरोबर काम करताना मजा येते.”

“मला जे करायचं आहे ते…”

सागर कारंडेबद्दल पुढे ते म्हणाले, “मला जे करायचं आहे ते त्याला कळतं. त्याला जे करायचं आहे ते मला कळतं. दोघांनी मिळून आम्ही खूप चांगले सीन केलेले आहेत. तो खूप हुशार आहे, त्यामुळे तोही खूप छान-छान जागा मला करायला लावायचा.”

एक आठवण सांगत ते म्हणाले, “एकदा एक स्कीट होतं, राजकुमार आणि रजनीकांत असं त्याचं नाव होतं. त्यामध्ये डान्स करायचा होता. तर डान्स म्हणजे मी फक्त पाय हलवायचो, हे कोणाला माहीत नव्हतं. फक्त मला, सागरला व कॅमेरामनला माहीत होतं. कॅमेरामनला सांगितलं होतं की अमुक गोष्ट केली की कॅमेरा पायाजवळ आण. अशा आम्ही अनेक गोष्टी केल्या आहेत.”

पुढे ते म्हणाले, “हल्ली कॉमेडी बदलली आहे, साध्या सोप्या शब्दातील चि. वी. जोशींची कॉमेडी, आता तसे लाफ्टर येणार नाहीत. कॉमेडी बदलत बदलत आता थोडीशी मॅडनेसकडे गेली आहे. लोकांना मॅड कॉमेडी आवडते.”

मॅड कॉमेडी म्हणजे काय? असे विचारले असता सुनील तावडे म्हणाले, “मी नेहमी भाऊ कदमचं उदाहरण देतो.” पुढे भाऊ कदम एखादा सीन कसा करतात, याचे उदाहरण दाखवले. पुढे ते म्हणाले की, ते जसा एखादा सीन करतात, त्यामुळे पटकन हसायला येते. ही मॅड कॉमेडी आहे, ही हल्लीची पद्धत आहे. फू बाई फूमध्ये माझा तो प्रयत्न असायचा. वेगवेगळ्या कलाकारांबरोबर फू बाई फूचे नऊ सीझन केले. तर मॅडनेस कॉमेडी, मॅड कॉमेडी मी गिरीश मोहितेकडून शिकलो.

तसेच सुनील तावडे असेही म्हणाले की, मी अशोक सराफ यांच्याकडून विनोदाचं टायमिंग शिकलो. याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यातील काही किस्सेही सांगितले.