Sunil Tawde on Alcohol: सुनील तावडे हे नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता ते ‘बाई तुझा आशीर्वाद’ या नवीन मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

सुनील तावडे यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी अनेकविध गोष्टींबद्दल वक्तव्य केले. त्यांच्या कारकिर्दीतील काही किस्से त्यांनी सांगितले.

नाटकाची गोडी कशी लागली, टेरेस शोज ही त्यांनी सुरू केलेली संकल्पना काय आहे? त्याबरोबरच शाळेतील आठवणी, आरोग्य अशा अनेक बाबींवर त्यांनी वक्तव्य केले. तसेच, त्यांना दारूचा का राग आहे, याबद्दलही त्यांनी सांगितले. ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊ…

Award Banner

“…आणि इंडस्ट्रीला अवकळा आली”

सुनील तावडे या मुलाखतीत म्हणाले, “मी समोरच्यांच्या चुकांमधून शिकलो आहे. लहानपणापासून या क्षेत्रात काम करत असल्यामुळे या इंडस्ट्रीबरोबर मी जोडला गेलो आहे. मी जेव्हा व्यावसायिक नाटकात काम करायला लागलो. मी आता नावं घेत नाही; पण बरेच नट व्यसनाधीन असल्यामुळे एकापाठोपाठ एक नाटकं बंद पडत गेली.”

ते पुढे म्हणाले, “अनेकांचे निधन झाले. प्रत्येकाची चार-चार, पाच-पाच नाटकं चालायची. त्यांना हाऊसफुल गर्दीही व्हायची. पण, त्या कलाकारांच्या निधनानंतर ती नाटकं बंद पडत गेली आणि इंडस्ट्रीला अवकळा आली. त्यानंतर नाटकांचं गणित बिघडून गेलं. त्यामुळे मला दारूविषयी भयंकर चीड आहे.”

“मी स्वत: दारू, तंबाखू, सिगारेट असं कोणतंच व्यसन…”

“दारूबद्दल नाही, पिण्याबद्दल मला चीड आहे. मी स्वत: दारू, तंबाखू, सिगारेट असं कोणतंच व्यसन करीत नाही. मांसाहारही करत नाही. पण, त्या गोष्टीबद्दल चीड आहे. कारण- इंडस्ट्रीला फटके बसले आहेत. आता लोक शहाणी होत आहेत; पण तरीसुद्धा काही लोक चुका करत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, हे करू नका. कारण- ती जबाबदारी आपली आहे. जेव्हा तुमची नाटकं चालतात, तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री तुमच्या नाटकावर अवलंबून असते. त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे”, असे म्हणत दारूचा का राग आहे, याबद्दल सुनील तावडे यांनी सांगितलं.

दरम्यान, सुनील तावडे आता यांची नवीन भूमिका प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.