Suraj Chavan New Home Nameplate : सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. ‘गुलीगत किंग’चा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. सूरजच्या पत्नीचं नाव संजना असून ती त्याच्या चुलतमामांची मुलगी आहे. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच अनेक राजकीय मान्यवर सुद्धा उपस्थित होते. आता सूरज-संजना त्यांच्या नव्या घरात सुखाचा संसार करत आहेत. ‘गुलीगत किंग’ने त्याच्या नव्या घराला काय नाव दिलंय पाहुयात…
‘बिग बॉस मराठी ५’ संपल्यावर अजित पवार यांनी सूरजला नवीन घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आता वर्षभरातच ‘गुलीगत किंग’ने त्याच्या आलिशान बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. सूरज चव्हाणचं नवीन घर खूपच सुंदर आहे. त्याच्या नव्या घरातील आकर्षक इंटिरियरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या घरात सूरजने आपल्या बायकोचं धुमधडाक्यात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. आता सध्या सूरजच्या नव्या घराची नेमप्लेट सर्वत्र चर्चेत आली आहे.
सूरजच्या घरची परिस्थिती आधी फार बेताची होती. पण, हळुहळू ‘गुलीगत किंग’ला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाली. यानंतर ‘बिग बॉस’ शो त्याच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आज हे सुख पाहायला आई-बाबा असले पाहिजे होते अशा भावना सूरज कायम व्यक्त करतो. यामुळेच त्याने आपल्या आलिशान घराला देखील आई-बाबांचं नाव दिलं आहे.
सूरज चव्हाणच्या बंगल्याबाहेर “आई-आप्पांची पुण्याई…सूरज चव्हाण व सौ. संजना चव्हाण” अशी नेमप्लेट लावण्यात आली आहे. तर आलिशान बंगल्याला सूरजने ‘आई-आप्पांची पुण्याई’ असं नाव दिलं आहे. या नेमप्लेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरजच्या नव्या घराच्या बाल्कनीतून आई मरी मातेचं शिखर सुद्धा दिसतं, असं सूरजने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

दरम्यान, सूरज चव्हाण आता ‘गोफणे’ परिवाराचा जावई झाला आहे. सूरज-संजनाचं लव्हमॅरेज आहे. या दोघांचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला सासवड-जेजुरी रोड येथे थाटामाटात पडला. लग्न झाल्यावर हे दोघंही जोडीने खंडेरायाच्या दर्शनाला जेजुरीला गेले होते.
