Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकला. सूरजचा विवाहसोहळा बारामतीत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सूरजने त्याच्या लग्नासाठी बिग बॉस मराठीमधील त्याच्या सहस्पर्धकांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं. पण, जान्हवी किल्लेकर वगळता सूरजच्या लग्नाला कोणीही गेलं नव्हतं. याबाबत काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती.

आता नुकत्याच ‘हॉट सीट टॉल्क’ला दिलेल्या मुलाखतीत सूरजने लग्नाला न येणाऱ्यांबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. “बिग बॉस मराठीच्या घरात असे अनेक लोक होते, ज्यांनी तुला भाऊ मानलं होतं, काही लोकांसाठी तू एकदम जिवलग मित्र होतास…पण, हे लोक तुझ्या लग्नाला आले नाहीत असं का झालं?” असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला होता.

सूरज चव्हाण यावर म्हणाला, “मी आता खरं बोललो तर सगळ्यांना टोचेल. पण, मी कोणाला वाईट बोलणार नाही…ते सगळे माझ्या जवळचे आहेत. आम्ही एकत्र ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहिलोय. मी त्या सगळ्यांना माझं कुटुंब मानतो. पण, त्यांनी एक गोष्ट पाळली पाहिजे होती ती म्हणजे…’गरीबाचं पोरगं आहे, आपण गेलं पाहिजे…’ खरंतर, माझी अपेक्षा नव्हती…पण, माझ्या सगळ्या फॅन्सना वाटत होतं की, आमच्या सूरजच्या दादाच्या लग्नाला सगळ्यांनी आलं पाहिजे. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण होता.”

Award Banner

तो पुढे म्हणाला, “सूरज चव्हाणचं लग्न सर्वात मोठं झालं कारण, महाराष्ट्रातील जनता माझ्यावर खूप प्रेम करते. कोणी नाही आलं तरी माझ्यासाठी माझा महाराष्ट्र आहे. माझे चाहते माझ्यासाठी आई-बाबांप्रमाणे आहेत. ते लोक माझ्या लग्नाला आले नाहीत…याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण, आपल्याला देव घडवतो, त्याने आपल्याला जन्म दिलाय. नेहमी देवावर विश्वास ठेवला पाहिजे. वाईट विचार करण्यापेक्षा आपण देवाचं नामस्मरण करावं.”

“माझी बिग बॉसची ट्रॉफी माझ्यासाठी लक्ष्मी आहे…ती माझ्या नशिबात होती. देवाने माझी सगळी स्वप्न पूर्ण केली…हा शो जिंकायचा हे मी मनापासून ठरवलं होतं आणि ते शक्य झालं.” अशा भावना यावेळी सूरजने व्यक्त केल्या.