Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. सूरज-संजनाचा विवाहसोहळा बारामतीला थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सूरजच्या लग्नाला नुकतेच ६ महिने पूर्ण झाले. गेल्या काही दिवसांपासून सूरजची पत्नी संजना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, ते सगळे संजना-सूरजचे AI फोटोज होते.

पण, आता सूरजची मानलेली बहीण व अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सूरज खरंच बाबा होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

जान्हवी किल्लेकर आपल्या लेकासह नुकतीच जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. जेजुरीवरून सूरजचं गाव खूपच जवळ आहे. त्यामुळे जान्हवी आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. जान्हवीने यावेळी सूरजच्या गावच्या मंदिरात जाऊन देवीआईचं दर्शन सुद्धा घेतलं. “कोणी असो-नसो…मी कायम तुझ्या सोबत आहे… तुला जपणार आहे” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

मात्र, जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरजच्या पत्नीचा संजनाचा बेबी बंप पाहायला मिळतोय. मंदिरात देवीच्या पाया पडल्यावर जान्हवी संजनाला आधार देत असल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसतंय. यामुळे संजना गरोदर असून सूरज लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

“संजना गरोदर आहे मग खाली का वाकतेय”, “अरे वाह गुडन्यूज आहे वाटतं”, “लवकरच गोड बातमी मिळणारे” अशा प्रतिक्रिया जान्हवीच्या व्हिडीओवर आल्या आहेत. मात्र, अद्याप सूरजने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, सूरजच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं, तर तो आता गोफणे परिवाराचा जावई झाला आहे. संजना व सूरज यांचं लव्हमॅरेज आहे. संजना ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी आहे. या दोघांच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह काही राजकीय मान्यवर देखील उपस्थित होते. याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा ‘गुलीगत किंग’च्या लग्नात सहभागी झाले होते. आता सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चांवर केव्हा प्रतिक्रिया देणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.