Suraj Chavan Interview : ‘बिग बॉस’ मराठीच्या ५ व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्याचे लाखो चाहते आहेत. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सूरजने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या संघर्षमय प्रवासासह भावना व्यक्त केल्या. चाहत्यांना तो देव मानत असून, त्यांच्यामुळे मोठा झाल्याचे मान्य केले. त्याचबरोबर सूरज चव्हाणने काही चाहत्यांनी त्याच्या घरी येऊन केलेल्या गैरवर्तनाचा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या घरी चाहते मद्यपान करून आल्याचे त्याने सांगितले आहे.

‘हॉट सीट टॉक्स’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सूरजने सोशल मीडियावरील सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. तो म्हणाला, “दुसऱ्यांचे व्हिडीओ पाहून मी ते कसे बनवतात, हे शिकलो. वाळू भरणं आणि शेणखताची कामं करून कष्टाच्या पैशातून पहिला मोबाईल घेतला. त्यानंतर दिवसाला ३० ते ३५ व्हिडीओ तयार करीत होतो. सुरुवातीला लोक माझी खिल्ली उडवत, ‘हा वेडा आहे’, अशा कमेंट्स करीत होते. मात्र, मी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.”

…म्हणूनच ते माझ्यावर प्रेम करतात – सूरज

चाहत्यांबद्दल बोलताना सूरज म्हणाला, “आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या फॅन्समुळे आहे. फॅन्स माझ्यासाठी देव आहेत. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र माझे डायलॉग बोलतो. लोक मला त्यांच्या घरातील एक असल्यासारखं मानतात. मी जसा आहे तसाच लोकांसमोर राहतो आणि म्हणूनच ते माझ्यावर प्रेम करतात. मी खरं बोलतो म्हणून लोकांना मी आवडतो.”

या लोकप्रियतेबरोबर आलेला एक कटू अनुभवही सूरजने सांगितला आहे. तो म्हणाला, “मी फॅन्सना खूप मान देतो; पण त्यांनीही मला समजून घेतलं पाहिजे. एकदा काही मुलं माझ्या घरी माझ्या घरी नशा करून आले होते. त्यांनी गुटखा खाऊन बाथरूममध्ये उलटी केली. त्यामुळे माझी बायको चिडली आणि तुमचे फॅन्स बाहेर ठेवायचे, असं तिनं सांगितलं.”

पुढे तो म्हणाला, “मी फॅन्सला इज्जत देतो ना, तर ते डोक्यावर बसतात. फॅन्सनी माझ्यावर डोक्यावर नाही, तर मनात बसावं. फॅन्सनी माझ्या मनावर राज्य केलं आहे आणि मी त्यांना माझ्या हृदयात ठेवतो; पण त्यांनी एवढं पण अती करू नये. पुढे सूरज म्हणाला की, मी फॅन्सला नेहमी महत्त्व देतो. बिग बॉस जिंकून आल्यानंतर मी रात्रभर लोकांना फोटो देत होतो. थोड्या वेळ झोपलो आणि पुन्हा सर्वांना भेटलो. जवळपास १० दिवस मी फक्त आणि फक्त फॅन्सना भेटत होतो.”