Suraj Chavan Wife Sanjana Baby Shower Mehendi Design : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने नुकतीच त्याच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रेक्षकांचा लाडका ‘गुलीगत किंग’ म्हणजेच सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. त्याच्या घरी सध्या बायकोच्या डोहाळेजेवणाची तयारी सुरू आहे. गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात डोहाळेजेवण किंवा ओटीभरण कार्यक्रम आयोजित केला जातो.

बाळासह आईच्या सर्व इच्छा, तिचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी आणि तिला आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. डोहाळेजेवणासाठी सूरज अन् संजनाने हातावर सुंदर मेहंदी काढून घेतली आहे.

संजनाच्या हातावरच्या सुंदर मेहंदीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तळहातावर शिव-पार्वती अन् गणपती बाप्पाचं चित्र, भगवान शंकराची पिंड, चिमुकल्या बाळाचं पहिलं पाऊल, लहान बाळाची गाडी अशा गोड चित्रांची झलक संजनाच्या मेहंदीमध्ये पाहायला मिळतेय. तर सूरजने हातावर चिमुकल्या बाळाचं चित्र रेखाटून ‘मी बाबा होणार…’ असं लिहून घेतलंय. तर, दुसऱ्या हाताच्या तळहातावर सूरजने ‘बेबी Loading…प्लीज वेट’ असं लिहिलं आहे. संजनाच्या डोहाळेजेवणाच्या मेहंदीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यापूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाची चोरओटी भरली होती. मार्च महिन्यात हा कार्यक्रम पार पडला होता. याशिवाय सूरज आणि संजनाची विचारपूस करण्यासाठी जान्हवी नुकतीच त्याच्या घरी बारामतीला सुद्धा गेली होती. याच व्हिडीओमुळे संजना गरोदर असल्याचं सर्वांसमोर रिव्हिल झालं होतं. जान्हवी मोठ्या बहिणीप्रमाणे सूरजला साथ देत असल्याने तिचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, सूरजच्या पत्नीचं नाव संजना गोफणे आहे. संजना ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी असून या दोघांचं लव्हमॅरेज आहे. या दोघांचा विवाहसोहळा नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामतीला पार पडला होता. सूरज-संजना या दोघांच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह काही राजकीय मान्यवर देखील उपस्थित होते. आता सूरजच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन केव्हा होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.