Suraj Chavan And His Wife : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता व लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला. सूरजच्या पत्नीचं नाव आहे संजना गोफेणे. या दोघांचं लव्ह मॅरेज असून, संजना ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी आहे. सूरज-संजनाचा शाही विवाहसोहळा सासवड येथे पार पडला होता. लग्नानंतर सूरज आपल्या पत्नीसह भन्नाट रील्स व्हिडीओ बनवताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र रंगल्या आहेत.

संजनाचे बेबी बंपबरोबरचे फोटो गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंबाबत कोणतंही स्पष्टीकरण सूरजच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आलेलं नाही. यामुळे सूरज खरंच बाबा होणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा सहाव्या सीझनचा फिनाले १९ एप्रिलला पार पडेल. फिनालेपूर्वी यावर्षीच्या फायनलिस्टला भेटण्यासाठी घरात मागील पर्वातील लोकप्रिय सदस्य पोहोचले होते. मेघा धाडे, शिव ठाकरे, पुष्कर जोग, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत यांच्यासह सूरज चव्हाण सुद्धा ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवर पोहोचला. यावेळी त्याची पत्नी देखील उपस्थित होती.

सूरज व त्याच्या पत्नीने अभिजीत सावंतबरोबर काढलेला फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे आणि या फोटोमध्ये संजना गरोदर नाहीये हे स्पष्टपणे कळून येतंय. तिचे AI, फेक एडिटेड, बेबी बंप असलेले फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विनाकारण व्हायरल केले जात आहेत.

सूरज-संजना एकत्र माध्यमांसमोर आल्यामुळे ते आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, याबाबत सूरजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. यापूर्वी जेव्हा संजनाचं फेक अकाऊंट क्रिएट करण्यात आलं होतं..त्यावेळी सूरजने व्हिडीओ शेअर करत, ‘माझी पत्नी इन्स्टाग्रामवर सक्रिय नाहीये’ असं सांगितलं होतं. यानंतर संजनाने इन्स्टा अकाऊंट जेव्हा अधिकृतरित्या सुरू केलं…याबाबतची माहिती सुद्धा सूरजने चाहत्यांना दिली होती. त्यामुळे हे फेक फोटो शेअर करणाऱ्यांवर ‘गुलीगत किंग’च्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

suraj
सूरजच्या पत्नीचे फोटो व्हायरल

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं, तर यावर्षी सहाव्या सीझनचे टॉप-५ फायनलिस्ट आहेत तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद. आता या पाच जणांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.