Suraj Chavan Wife Sanjana : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सूरज नुकताच त्याच्या होणाऱ्या पत्नीसह अंकिता वालावलकरच्या घरी पोहोचला होता. यावेळी ‘कोकण हार्टेड गर्ल’ने मोठ्या प्रेमाने या दोघांचं केळवण केलं. याशिवाय लग्नाच्या संपूर्ण शॉपिंगमध्ये अंकिताने सूरजची मदत केल्याचं पाहायला मिळालं.

सूरजच्या बायकोचं नाव आहे संजना. सूरज व संजना या महिन्यात २९ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. २८ नोव्हेंबरपासून त्याच्या लग्नविधींना सुरुवात होईल.

अंकिता वालावलकर सूरज व संजना या दोघांना घेऊन लग्नाच्या शॉपिंगसाठी गेली होती. यावेळी ती म्हणाली, “सूरजच्या बायकोने आधीच साड्या घेतल्यात. आता तिच्या साडीच्या रंगानुसार सूरज स्वत:ची शॉपिंग करतोय. संजना अजून थोडी कॅमेरा शाय आहे. हळुहळू सूरज तिला सगळं काही शिकवेल.”

सूरज चव्हाणचं लग्न कसं जमलं याबद्दलही अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. सूरजचं अरेंज मॅरेज नाहीये. तो लव्ह मॅरेज करतोय, संजना ही सूरजच्या चुलतमामाची मुलगी आहे. असं अंकिता व सूरज यांनी लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

सूरज-संजनाचं केळवण, गुलीगत किंगचा हटके उखाणा…

अंकिताने या दोघांच्या केळवणासाठी जय्यत तयारी केली होती. फुलांची सजावट तसेच सूरज व संजनासाठी खास पुरी-भाजीचा बेत केला होता. अंकिताने यावेळी सूरज अन् त्याच्या पत्नीचं औक्षण केलं. यानंतर दोघांनाही तिने खास भेटवस्तू दिल्या.

यावेळी उखाणा घेत सूरज म्हणतो, “बिग बॉस’ जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न…संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!” तसेच पुढे संजना उखाणा घेत म्हणते, “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको…सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!”

दरम्यान, सूरज-संजना येत्या २९ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. याच दिवशी कुटुंबात आणखी एकाचं लग्न असल्याने अंकिता सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीये.