Suruchi Adarkar and Piyush Ranade blessed with baby girl: लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. सुरुची अडारकर आणि पियुष रानडे आई बाबा झाले आहेत.
सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी दिली आनंदाची बातमी
सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे, “खूप आनंदाने आणि अभिमानाने संपूर्ण जगाला हे कळवण्यास आनंद होत आहे की आम्हाला मुलगी झाली आहे.” शेवटी सुरुची आणि पियुष असे लिहिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच, हे पोस्टर शेअर करताना सुरुची अडारकरने लिहिले, “टीममध्ये आम्ही दोघेच होतो. आता आयुष्याने आम्हाला आमचा सर्वात सुंदर सहकारी(Teammate) दिला आहे.” तिने ही पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सुरुचीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नम्रता संभेरावने, वोहो, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. श्रेया बुगडेने, “माय बेबीज, गॉट अ बेबी. हॅपी अत्तू”, अशी कमेंट करीत आनंद व्यक्त केला आहे. ऐश्वर्या नारकर, अद्वैत दादरकर, शर्वरी कुलकर्णी, कश्मिरा कुलकर्णी, नंदिता पाटकर, अक्षया गुरव, पल्लवी वैद्य, मेघना एरंडे, अभिजीत खांडकेकर, गिरिजा प्रभू अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अधोक्षज कऱ्हाडेने लिहिले, “खूप अभिनंदन! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली. आई दुर्गेचा आशीर्वाद.”

त्याबरोबरच, अनेक चाहत्यांनीही कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने लिहिले, “नवरात्रीला घरी लक्ष्मी आली. दोघांचे खूप खूप अभिनंदन”, दुसऱ्या एकाने लिहिले, “मुलीच्या जन्माबद्दल सांगण्यासाठी किती शुभ दिवस निवडला आहे”, एकाने लिहिले, “ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. तुमच्या दोघांचेही खूप अभिनंदन”, आणखी एकाने लिहिले,”अभिनंदन पीयूष आणि सुरुची. गौरीई घरी आली”, अशा अनेक कमेंट्स करीत चाहत्यांनी सुरुची व पियुषला शुभेच्छा दिल्या आहेत.





दरम्यान, सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत. संपूर्ण इंडस्ट्रीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.
