Sushant Shelar on Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ हा शो लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. दरवर्षी हा शो विविध भाषांमध्ये प्रदर्शित होतो. हिंदी, कन्नडसह मराठी भाषेतही हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. हिंदी बिग बॉसचे आतापर्यंत १९ पर्व प्रदर्शित झाले आहेत, तर ‘मराठी बिग बॉस’चे ६ पर्व प्रदर्शित झाले आहेत. प्रत्येक सीझनमधील स्पर्धक हे वेगळे असतात. या शोची दरवर्षी थीम बदलते. प्रत्येक स्पर्धकाला या शोचा वेगळा अनुभव येतो.
अभिनेता सुशांत शेलार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने ‘बिग बॉस’ या शोबद्दल त्याचे मत काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, याबरोबरच या शोमधून त्याला काय शिकायले मिळाले याबद्दल वक्तव्य केले आहे.
सुशांत शेलार काय म्हणाला?
सुशांत शेलारने नुकतीच सोनचाफा प्रोडक्शनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बिग बॉसमध्ये त्याला काय अनुभव आला याबद्दल विचारले. यावर तो म्हणाला, “बिग बॉस म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. मी पहिल्या पर्वात सहभागी झालो होतो. उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, राजेश श्रृंगारपुरे, भूषण कडू, जुई गडकरी असे अनेक कलाकार होते.”
शो स्क्रीप्टेड असतो का? यावर अभिनेता म्हणाला, “तिथे स्क्रिप्टेड काहीच नसतं. सगळं खरं असतं. साधा विचार करायचा तर, खूप वर्षे मैत्री असलेल्या मित्रांना एका खोलीत बंद केलं, फोन काढून घेतले आणि आपल्याला ४८ तास एकेक टास्क दिले. त्यावर ठरणार की तुम्हाला काय जेवायला मिळणार आणि काय मिळणार नाही, तर भांडणे होणार.”
या शोमधून काय शिकायला मिळाले? यावर अभिनेता म्हणाला, “भावना व संयम, तसेच आपल्या आयुष्यात असलेल्या लोकांचं महत्त्व शिकलो. त्यांची जाणीव मला त्या सोन्याच्या पिंजऱ्याने करून दिली”, असे म्हणत सुशांतने बिग बॉसबद्दल त्याच्या काय भावना आहेत, याबद्दल सांगितले.
बिग बॉस मराठी १ हा सीझन प्रचंड गाजला होता. प्रत्येक स्पर्धकाची चर्चा झाली होती. अनेकांना लोकप्रियता मिळाली. पहिल्या पर्वात मेघा धाडे विजेती ठरली होती तर पुष्कर जोग उपविजेता ठरला होता. मेघा धाडे सध्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत भैरवी या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे; तर पुष्कर विविध चित्रपट, गाणी याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
दरम्यान, सध्या हिंदी भाषेतील बिग बॉसच्या २० व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, पर्वात कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.
