‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अभिनेता गौरव मोरे आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. या ‘फिल्टरपाड्याच्या बच्चन’ने चाहत्यांना दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. यातील पहिली बातमी म्हणजे, गौरवने प्रियांका कारेकरशी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तर, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे गौरवने त्याच्या पवईमधल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. गौरवच्या नव्या घराच्या पूजेला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा गौरवला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचल्या होत्या.

गौरवचं नवीन घर पाहिल्यावर सुषमा अंधारेंनी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुषमा अंधारे यांची पोस्ट

गौरव मोरे हा माझ्या लेकीचा हास्यजत्रेतील सगळ्यात आवडता कलाकार…. वाढदिवसाचं गिफ्ट काय हवंय म्हटलं तर मला गौरव मामाला भेटायचंय…दोघांच्याही कामाच्या वेळा इतक्या घाई गडबडीच्या त्यात लेकीच्या शाळेचं वेळापत्रक… पण काल गृहप्रवेशाच्या निमित्ताने भेट झालीच….अमिताभ बच्चनचा एक गाजलेला डायलॉग आहे… “इंसान चाहे जितनी बुलंदी पर पहुँच जाए, अपनी औकात नहीं भूलनी चाहिए…बोले तो अपने वजुद को खोने का नहीं…!

Award Banner

वजुद… अस्तित्व… अस्मिता… ओळख… आपलं मूळ आपण जिथून सुरुवात केली… इंग्रजीत एक अतिशय चांगली म्हण आहे. One, Who Knows Their Roots They Can Get The Fruits अर्थात ज्यांना स्वतःची मुळे माहीत असतात त्यांनाच भविष्यातली फळ मिळत असतात…. मुळं जितकी घट्ट खोलवर रुजतात झाड तितकं अधिक बहरत जातं… मूळ घट्ट रुजणं म्हणजे काय हे आज गौरवचं घर पाहिल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवलं…घर म्हणजे नुसत्या चार भिंती नाही…तर मानसिक स्थैर्याची जागा… आम्हा मध्यमवर्गीय माणसांसाठी तो चौसोपी बंगला आहे की वनरूम किचन यापेक्षा ते स्वतःचं हक्काचं घर आहे. जे स्वतःच्या निढळाच्या घामाने उभं केलंय.

पवईमधला सुंदर २ बीएचके…. अफलातून इंटिरियर…. ज्यांच्यामुळे आपण उभे आहोत त्यांचं दर्शनी भागातलं अधिष्ठान… प्रवेशद्वारावर आपण जिथून आलोय तिथली खूण सांगणारी “फिल्टरपाड्याचा बच्चन” ही अतिशय गोड आणि हटके पाटी… घरभर कॉर्पोरेट जगतातली नाही तर आयुष्यभर सुख-दुःखामध्ये उभी राहिलेली अतिशय जिवाभावाची माणसं आणि त्यांचं प्रेम आणि कौतुकाने आनंदून गेलेला गौरव अन् आपल्या लेकाचं कर्तृत्व आणि कौतुक न्याहाळत तृप्त झालेली आई…

मजा आली.. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी कलाकार निव्वळ आपल्या मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करतो तेव्हा भारी तर वाटणारच….गौरव, भय्यू तुला खूप खूप शुभेच्छा.. वास्तू फलद्रुप होवो…Gaurav Devidas More #नवीनघर #वास्तु #गृहप्रवेश #स्वप्नपूर्ती

दरम्यान, गौरवला पवईतील हे घर म्हाडा लॉटरीमध्ये लागलं होतं. घरातील इंटिरियरचं काम पूर्ण झाल्यावर आता अभिनेत्याने कुटुंबासह या आलिशान फ्लॅटमध्ये गृहप्रवेश केला आहे. गौरव मोरेवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.