Sushma Murudkar Reveals MeToo Shocking Experience : ‘कमळी’ मालिकेत रागिणीची ( अनिकाची आई ) भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सुषमा मुरुडकर साकारत आहे. सुषमाने आजवर मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. पण, महिलांसाठी जे सुरक्षित वातावरण आपल्या मराठी मालिकांच्या सेटवर असतं…तो अनुभव हिंदीत काम करताना आला नाही, असा धक्कादायक खुलासा सुषमा मुरुडकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सुषमा मुरुडकर राजश्री मराठीशी संवाद साधताना म्हणाली, “इंडस्ट्रीत नेमकं काय करायचं नाही… हे मला हिंदीत काम करताना समजलं. त्यामुळेच मी त्या इंडस्ट्रीतून बॅकफूटवर आले, त्यांना कायमचा जय महाराष्ट्र केला. मराठी इंडस्ट्रीत मी खूप जास्त सुरक्षित आहे, मला इथे Safe वाटतं. हिंदीत मला इतकं Safe वाटलं नाही. जे काही म्हटलं जातं…MeToo वगैरे हे सगळं सत्य आहे. तुम्हाला तिथे या गोष्टींचा सामना करावा लागतो. पण, मराठीत मला असा कोणताच त्रास झाला नाही. हिंदीत मात्र हा अनुभव आला.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझं सहा महिने व्यवस्थित काम चालू होतं, सगळं नीट सुरू होतं. त्या सेटवर माझा मित्र म्हणजे.. माझा फोन! मोकळ्या वेळेत मी फोनवर असायचे… टिकटॉक पाहायचे. मी टिकटॉक व्हिडीओ शूट करायचे आणि परत व्हॅनिटी…बाकी असं वेगळं मी काहीच करायचे नाही. एकदा निर्माता माझ्या रूममध्ये आला आणि तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मी थेट सांगितलं…लांब राहायचं.”

“मी त्याला लांब राहा सांगितल्यावर तो म्हणाला, ‘आता तुमचं काम पुढच्या सात दिवसांत संपवावं लागेल. मी मालिकेत तुमच्या आत्महत्येचा सीन आणायला सांगतो.’ मी म्हटलं, ‘चालेल’…. पुढे तो निर्माता म्हणाला, ‘तुम्हाला पैसे कमी मिळतील…’ मी त्यावरही ‘चालेल’ असं उत्तर दिलं. सातव्या दिवशी त्या मालिकेत माझ्या मर्डरचा सीन होता. सहा दिवस नीट शूट केलं मग…सातव्या दिवशी मर्डरचा सीन होता. मी त्या मालिकेत मेले..टाटा-बाय बाय केलं. यानंतर त्या निर्मात्याने माझी माफी मागितली होती…तो भाग वेगळा, पण या अशा गोष्टी होतात. मात्र, मराठी इंडस्ट्रीत मी असं कधीच अनुभवलेलं नाहीये.” असं यावेळी सुषमाने स्पष्ट केलं.

पुढे मराठी इंडस्ट्रीबद्दल ती म्हणाली, “आपल्या मराठी इंडस्ट्रीत सगळे एकमेकांचे काका, मामा, दादा, ताई असतात. सगळे एकत्र छान काम करतात. मराठीत रात्री १२-१ वाजेपर्यंत शूटिंग असेल तरी मला भीती वाटत नाही. म्हणून मराठीत चार पैसे कमी मिळाले तरी चालतील. पण, हे सुरक्षित वातावरण असणं फार महत्त्वाचं आहे.”