Swanandi Tikekar New Home : मुंबईसारख्या मायानगरीत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, सध्या मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. तरीही आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली वर्षानुवर्षे अनेक मराठी कलाकार मेहनत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौरव मोरेने आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. याशिवाय वनिता खरात, अंशुमन विचारे, सिद्धार्थ-मिताली, अंकिता वालावलकर अशा बऱ्याच कलाकारांनी यंदाच्या वर्षी त्यांच्या स्वप्नातलं घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं.

आता या पाठोपाठ छोट्या पडद्यावरच्या आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे स्वानंदी टिकेकर. वैयक्तिक आयुष्यात स्वानंदीने २०२३ मध्ये गायक आशिष कुलकर्णीशी लग्न केलं. लग्नानंतर मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं या दोघांचंही स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न तीन वर्षांनी पूर्ण झाल्याचं या दोघांनीही पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांनी मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. नव्या घराच्या बाल्कनीत यांनी खास फोटोशूट करत एक सुंदर पोस्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

आशिष कुलकर्णी लिहितो, “गेली ३ वर्षं आम्ही नवीन घर खरेदी करायचंय यावर फक्त चर्चा करायचो पण, आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. असं एक स्वप्न ज्याबद्दल मी आणि माझी पत्नी स्वानंदी आम्ही दोघंही सतत गप्पा मारायचो. या घराचं स्वप्न आम्ही लाँग ड्राइव्हला गेल्यावर, चहा पिताना आणि भाड्याच्या एका घरातून दुसऱ्या घरात स्थलांतरित होताना कायम पाहिलं….आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं. मुंबईमध्ये आता आमचं स्वत:चं हक्काचं घर आहे! हा हक्काच्या घराचा आनंदाचा क्षण आयुष्यात कधी येईल…याची सुरुवातीला आम्हाला काहीच खात्री नव्हती, तसा विचारही केला नव्हता. फक्त हे स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होणार असा विश्वास होता. आज त्या स्वप्नाला एक नवीन पत्ता मिळाला. प्रिय मुंबई…तू आम्हाला तुझ्यात सामावून घेतलंस त्याबद्दल थँक्यू!”

स्वानंदी आणि आशिष यांनी नवीन घर खरेदी केल्याची पोस्ट शेअर करताच मराठी कलाकारांसह चाहत्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय ‘झी मराठी’वरील ‘अगंबाई सुनबाई’ मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. तर, स्वानंदीचा पती आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे.