‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात थाटामाटात पार पडला होता. या दोघांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच या दोघांनी ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स केला. परंतु, डान्स करताना एक वेगळाच मजेशीर ट्विस्ट आल्याचं स्वानंदीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य कलाविश्वाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा’ चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा २’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालनं नोंदणी पद्धतीनं केलं लग्न, अभिनेत्री खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाली, “सात वर्षांपूर्वी…”

‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालं. “अंगारो का अंबर सा लगता हैं मेरा सामी…” असे या गाण्याचे बोल असून हे गाणं लोकप्रिय गायिका श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. सध्या सगळेच सेलिब्रिटी ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता नुकताच स्वानंदी आणि आशिष यांनी या गाण्यावर डान्स केला. पण, यामध्ये एक भलताच ट्विस्ट आला याबद्दल अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

स्वानंदी टिकेकर लिहिते, “आमची डान्स रिहर्सल खूपच वाईट होती की, आम्ही फायनल टेक घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.” स्वानंदी-आशिषने रिहर्सलमध्ये केलेला गोड डान्स जसाच्या तसा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जोडप्याचं सुंदर बॉण्डिंग यातून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : किरण मानेंच्या पत्नीला पाहिलंत का? खास पोस्ट लिहित म्हणाले, “माझा हात हातात घेऊन…”

अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कलाकारांनी भन्नाट कमेंट्स करत तिच्या कॅप्शनचं देखील कौतुक केलं आहे. जुई गडकरी, अदिती द्रविड, स्वानंदीचे बाबा उदय टिकेकर, यशोमन आपटे, क्षितीश दाते या कलाकारांनी कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देत हसण्याचे इमोजी जोडले आहेत.

दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे.