Swapnil Rajshekhar On Somnath Vaishnav accident and Amitabh Bachchan: आज (११ ऑक्टोबर) अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी बिग बींच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या सहकलाकाराबद्दलही लिहिले आहे.
नुकताच घडलेला एक प्रसंग सांगताना स्वप्नील राजशेखर यांनी लिहिले, “सोमनाथ वैष्णव. अकलुजचा आमचा हरहुन्नरी अभिनेता मित्र आहे. सध्या आम्ही ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत एकत्र काम करतोय. काल शूटिंगला जाताना त्याला अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं. थोडक्यात तरी कसं म्हणावं? त्याच्या हाताचं एक बोट अक्षरशः उद्ध्वस्त झालं. प्रचंड वेदनेत असणाऱ्या रक्ताळल्या हाताच्या सोमनाथला लोकांनी दवाखान्यात नेलं.”
“तिथे त्याच्या बोटाची अवस्था बघून डॉक्टरांनी लगेच त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायचं ठरवलं. तर सोमनाथ डॉक्टरना म्हणाला की, सध्या पट्टी करून काही तरी पेनकिलर देता का? माझं शूटिंग थांबलंय, तेवढं करून येतो. डॉक्टरांनी ते न ऐकता, लोकल ॲनेस्थेशिया देऊन बोट वाचविण्यासाठी प्राथमिक जे आवश्यक करण्यासारखं होतं ते केलं आणि मगच पाठवलं. पूर्ण विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. दोन तासात सोमनाथ बांधल्या हातानिशी शूटिंग करत होता. मी त्याला विचारलं की, कुठे नोकरी करत असतास किंवा तुझं दुकान वगैरे असतं, तर या अवस्थेत गेला असतास का कामावर? सोमनाथ हसला. आता मी हे लिहिताना तो दुखरा हात लपवत शॉट देतोय.”
“अमिताभ बच्चन असो किंवा आमचा सोमनाथ वैष्णव…”
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल त्यांनी लिहिले, “केबीसीच्या सेटवर हल्लीच एकदा सुरू असलेल्या शूटिंगमधध्ये बच्चन एका ट्रॉलीला ठेचकाळला. पायाचं बोट फ्रॅक्चर झालं. डॉक्टरांनी बोटाला प्लास्टर केलं. पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. तर साहेब तासाभरात केबीसी सेटवर शूटिंगसाठी उभे होते. ते म्हणाले की मी आज धावत येत नाही. हळूहळू चालत येईन. पाय दुखतोय. क्यू मिळाल्यावर युनिटनं पाहिलं, साहेब जोशात धावत आले. नंतर विचारल्यावर म्हणाले की माहीत नाही; पण कॅमेरा सुरू झाल्यानंतर मी पळायला लागलो. अमिताभ बच्चन असो किंवा आमचा सोमनाथ वैष्णव, ही पॅशन कमाल असते. सोमनाथ गेली १५-१७ वर्षे काम करतोय. अकलुज, मुंबई, पुणे, चंद्रपूर, कोल्हापुर, जिथे मिळतील तिथे भूमिकांसाठी धावतोय.”
शेवटी त्यांनी लिहिले, “तिकडे बच्चनसाहेबांना ८४ वर्षे होत आहेत; पण पहिल्या शॉटपासूनची पॅशन आजही तशी आहे. मला त्या पॅशनचं अप्रूप आहे. आजही साहेब धावतायत. सतत लाखो-करोडोंना प्रेरणा देत आहेत. आज बर्थडे बच्चनचा, जियो हजारो साल अमिताभ बच्चन. तूच बच्चन आहेस रे, आमचा अमिताभ बच्चन.”
स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सोमनाथ वैष्णव यांनी कमेंट करीत लिहिले, “स्वप्नीलदादा ही पोस्ट वाचून आता मी काही आता थांबत नाही. काहीही झालं तरी आपण दिलेली कमिटमेंट, आपल्यासाठी खोळंबलेलं युनिट, ही भावना मनात सारखी बोचत राहते. बोट तुटलेलं असलं तरी तुमचं मन मात्र आपल्या शूटिंगचं कसं होईल? या विचारातच असतं. बाकी, दादा, बच्चनसाहेबांचा वाढदिवस आणि माझ्याविषयीची ही पोस्ट कायम स्मरणात राहील. खूप आभार आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मला काही होत नाही”, असे लिहीत अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, स्वप्नील राजशेखर अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांच्या अनेक पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
