Tula Shikvin Changalach Dhada Fame Swapnil Rajshekhar : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची म्हणजेच चारुहासची भूमिका अभिनेते स्वप्नील राजशेखर साकारत आहेत.
अभिनेते स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा या माध्यमातून ते विविध सामाजिक विषयांवर भाष्य करतात. काही महिन्यांपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पोस्ट शेअर करत त्यांनी स्पष्ट मत मांडलं होतं. आता अभिनेत्यांनी त्यांच्या नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फोनवर गप्पा मारत बाईक चालवणाऱ्या रायडर्सची कोल्हापुरी स्टाईलने शाळा घेतली आहे.
“बाईक चालवताना फोनवर बोलणारे नागरिक त्यांच्या आयुष्यात खूप जास्त व्यग्र असतात, त्यांना जीवाचीही काळजी नसते त्यामुळे अशा लोकांना शिव्या न देता सलामी द्या”, असं स्वप्नील राजशेखर त्यांच्या व्हिडीओमध्ये बोलत आहेत.
अभिनेते सांगतात, “बाईक चालवत असताना कानाला फोन लावून गप्पा मारणारी ही माणसं असतात ना…ही साधीसुधी माणसं नाहीत. या माणसांना तुम्ही अजिबात सामान्य समजू नका. ही खूप महत्त्वाची माणसं आहेत… यांच्यावर भरपूर काम सोपवलेलं आहे असं मला वाटतं. आपल्या देशाची सुरक्षा यांच्याच हातात आहे असा माझा अंदाज आहे. मला वाटतं सुरक्षेसंदर्भातील सगळी माहिती या माणसांकडे असते म्हणूनच त्यांना एवढे फोन येत असतात. हे लोक त्यांच्याकडची गुप्त माहिती चालत्या बाईकवरून फोन करत पीएमओ ऑफिसला पाठवत असावेत, म्हणूनच एवढे बिझी असतात.”
“रस्त्याच्या कडेला, एका बाजूला उभं राहून आपण फोनवर बोलावं एवढाही वेळ या लोकांकडे नसतो. त्यामुळे हे लोक स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून चालत्या गाडीवर फोनवर बोलत जातात. ही एवढी मोठी रिस्क… हे लोक फक्त आपल्यासाठीच घेतात असा माझा अंदाज आहे. अशी एका हातात फोन घेऊन गाडी चालवणारी माणसं तुम्हाला दिसली की, त्यांच्यावर अजिबात चिडू नका. त्यांच्याशी वाद घालू नका, शिव्याही नको त्यांना सॅल्यूट मारा…१०० तोफांची सलामी द्या! ही सगळी माणसं महत्त्वाची आहेत.” असा उपरोधिक व्हिडीओ शेअर करत स्वप्नील राजशेखर यांनी सद्य परिस्थितीवर स्पष्ट मत मांडलं आहे.
दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ते ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘कलर्स मराठी’च्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विविध मालिका, चित्रपटांमुळे ते घराघरांत लोकप्रिय आहेत.