स्वरदा ठिगळे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मालिकांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्वरदा सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण अनुभवत आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. अशातच नुकतंच तिने तिच्या चोर ओटीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

स्वरदा ठिगळेने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे बेबी बंम फ्लॉन्ट करतानाचे फोटो पोस्ट करत दोघे आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांसह कलाकार मित्र-मैत्रिणींनीही या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या चोर ओटीचा व्हिडीही शेअर केलाय. खरंतर हा व्हिडीओ तिच्या प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या दिवसांतील असून आता अधिकृतपणे गरोदर असल्याची माहिती दिल्यानंतर तिने हा व्हिडीओ पोस्ट केलाय.

स्वरदाने शेअर केला चोर ओटीचा व्हिडीओ

या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमधून स्वरदा म्हणाली, “गर्भवती महिलेसाठी केली जाणारी चोर ओटी ही महाराष्ट्रातील एक सुंदर परंपरा आहे. या विधीत होणाऱ्या आईला गुपचूप ओटी भरून तिच्या आणि बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम दिलं जातं. कुटुंब, संस्कृती आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा हा आनंद साजरा करणारी ही खास परंपरा आजही जपली जाते.” अभिनेत्रीने पुढे तिच्या आईचेही या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आभार मानले आहेत.

चोर ओटीदरम्यान स्वरदाने गुलाबी रंगाची नक्षीदार साडी नेसल्याचं दिसतं. यावेळी तिने साजेसे दागिने आणि छान हेअरस्टाईल करत तिचा लूक पूर्ण केला. लवकरच आई होऊ पाहणारी स्वरदा यामधून खूप गोड आणि उत्साही दिसत आहे. तर तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून चोर ओटीसीठी घराचीसुद्धा सुंदर सजावट केल्याचं पाहायला मिळतं. स्वरदाची आई आणि घरातील इतर सदस्य तिची चोर ओटी भरताना दिसत आहेत. तर यावेळी तिचा नवरासुद्धा उपस्थित असल्याचं दिसतं.

दरम्यान, स्वरदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकलेली. ज्यामध्ये ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती.