Swaraj Doordarshan Show Budget: २०२२ मध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दूरदर्शनवर ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम सुरू केला होता. १४ ऑगस्ट २०२२ ला या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

अमित शाह यांनी ‘स्वराज’ हा शो लॉन्च केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शोचे प्रमोशन केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार याचे बजेट ५० कोटींहून जास्त होते. ‘स्वराज’ची निर्मिती अभिमन्यू सिंग यांनी स्थापन केलेल्या प्रॉडक्शन हाऊस कॉन्टिलो पिक्चर्सने केली होती. अभिमन्यूने न्यूजलॉन्ड्रीला सांगितले की, हा शो २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण त्यावर काम २०२० मध्ये सुरू झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, दूरदर्शनने कॉन्टिलोला एका एपिसोडसाठी ४७ लाख रुपये दिले. १८ टक्के जीएसटीसह ही रक्कम प्रति एपिसोड अंदाजे ५५.४६ लाख रुपये होते. अशा प्रकारे ७५ एपिसोडसाठी अंदाजे ४१.५९ कोटी रुपये खर्च आला.

एका एपिसोडसाठी झालेला ‘इतके’ लाख खर्च

प्रसार भारतीने शोच्या प्रमोशनवर ९ कोटींहून अधिक खर्च केले. कारच्या सनशेड्स छापण्यासाठी २,०८,१५२ रुपये तर होर्डिंग्जसाठी २४,१९० आणि ट्विटर ट्रेंड्सवर १,८८,८०० खर्च केले. शिवाय बातम्यांमध्ये जाहिराती देण्यासाठी बुबना नावाच्या जाहिरात एजन्सीला १.६३ कोटी दिले गेले. शिवाय, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्सला प्रचारासाठी ७.४८ कोटी दिले.

स्वराजमध्ये काही परदेशातील कलाकारांनीदेखील काम केले. सॅमी जोनास हिनीचादेखील यामध्ये समावेश होता. स्वराजचा प्रत्येक नवीन एपिसोड रविवारी सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता डीडी नॅशनलवर प्रसारित होत असे; तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी दुपारी १ वाजता आणि शनिवारी रात्री ९ वाजात पुन्हा प्रदर्शित होत असे. तसेच, ऑल इंडिया रेडिओवरदेखील हा कार्यक्रम दर शनिवारी ९ वाजता प्रसारित होत असे. तरीही या शोला अपेक्षित टीआरपी मिळाला नाही. टीआरपीच्या शर्यतीत टॉप ३० मध्ये तो जागा निर्माण करू शकला नाही.

न्यूजलॉन्ड्रीच्या मते, ‘स्वराज’ची सरासरी प्रेक्षकसंख्या (AMA) आठवड्याला कमी होत होती, यामुळे ‘स्वराज’ला जाहिरातींचे उत्पन्न कमी झाले आणि दूरदर्शनला जाहिरात दर कमी करावे लागले.

दूरदर्शनच्या एका कर्मचाऱ्याने न्यूजलॉन्ड्रीला सांगितले की, “स्वराजच्या जाहिरातींचा दर सुरुवातीला प्रति १० सेकंदासाठी ६०,००० रुपये होता. नंतर तो कमी करून प्रति १० सेकंदासाठी १६,००० रुपये करण्यात आला. शोचे रँकिंग घसरल्यानंतर हा दर प्रति १० सेकंदासाठी ८,००० रुपये इतका घसरला.”