Snehlata Vasaikar in Sony TV Vashikaran Horror Hindi Serial : मराठी मनोरंजनसृष्टीतल्या अनेक लोकप्रिय कलाकार आता हिंदी मालिका, वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. अक्षया नाईक, अमृता खानविलकर, प्रिया बापट, सई ताम्हणकर, मानसी साळवी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षांत हिंदी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता या पाठोपाठ आणखी एक मराठी अभिनेत्री हिंदी मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकर आता लवकरच एका हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. स्नेहलताने इन्स्टाग्रामवर या हिंदी मालिकेचा प्रोमो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
स्नेहलता वसईकर लवकरच ‘सोनी टीव्ही’वरील ‘वशीकरणं- किस पर रखें विश्वास?’ या हॉरर मालिकेत झळकणार आहे. स्नेहलताचा करारी आवाज, तिचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘वशीकरणं’ मालिकेचा हा प्रोमो पाहून अंगावर काटा येतोय असंही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. आता या थ्रिलर मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘सोनी टीव्ही’ लवकरच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख जाहीर करेल. दरम्यान, स्नेहलताने हा प्रोमो शेअर केल्यावर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अक्षय केळकर, सीमा घोगळे, पूर्वा गोखले यांसह अनेक कलाकारांनी स्नेहलताला या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“कमाल”, “अंगावर काटा आला”, “स्नेहलता मॅम नेहमीच कमाल भूमिका साकारतात”, “वॉव हे काहीतरी वेगळं आणि जबरदस्त असेल”, “मॅडम आम्ही आतुरतेने वाट पाहतोय” अशा असंख्य प्रतिक्रिया स्नेहलताच्या चाहत्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
दरम्यान, स्नेहलता वसईकर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ अशा विविध ऐतिहासिक मालिकांमधून घराघरांत पोहोचली. ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील सहभागी झाली होती. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यासह काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत झळकली होती. मात्र, या मालिकेतून तिने काही दिवसांतच एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं.

