Swarda Thigale Blessed With Baby Girl : ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री स्वरदा ठिगळेने नुकतीच तिच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर २ वर्षांनी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला असून, २० सप्टेंबरला तिला कन्यारत्न झालं आहे. स्वरदाने लेकीच्या चिमुकल्या हाताचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे.

स्वरदा ठिगळेला २० सप्टेंबरला मुलगी झाली. ही गोड बातमी अभिनेत्रीने ७ दिवसांनी म्हणजेच २७ सप्टेंबरला सर्वांबरोबर शेअर केली. यामागे कारणही तसंच आहे, २७ तारखेला यंदा ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अभिनेत्रीने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

स्वरदा लिहिते, “एवढे दिवस ही कथा फक्त आम्हा दोघांची होती…पण, आता आमच्या कथेत या चिमुकलीचं आगमन झालेलं आहे आणि आता एका सुंदर अध्यायाची सुरुवात होत आहे. तिच्यामुळे आमच्या आयुष्याला पूर्णपणे एक नवीन अर्थ मिळाला आहे. २० सप्टेंबरला आम्हाला गोंडस लेक झाली. सर्वांना आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!”

स्वरदाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, स्वरदा मार्च २०२४ मध्ये विवाहबंधनात अडकली, अलीकडेच तिच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. अभिनेत्रीच्या नवऱ्याचं नाव आहे सिद्धार्थ राऊत. स्वरदाने जून महिन्यात बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तेव्हाच तिने आई होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना दिली होती. आता अभिनेत्री आपल्या चिमुकलीचं नाव काय ठेवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.