TMKOC Actress Talks About Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ आता महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक होत असून घरात टिकून राहणं आणि स्ट्रॅटेजी आखणं स्पर्धकांसाठी आव्हानात्मक होत चाललं आहे. परंतु, असं असतानाही घरात असेही काही स्पर्धक आहेत जे अजूनही चाचपडतच आहेत, त्यांना अजूनही खेळ समजून घ्यायला आणि टास्क खेळायला जमत नसल्याचं दिसतं. अशा प्रतिक्रिया मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.

इंडस्ट्रीतील अनेक कलाकार, विशेष म्हणजे ‘बिग बॉस’मध्ये पूर्वी सहभागी झालेले माजी स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मधील स्पर्धकांच्या खेळाबद्दल नाराजी व्यक्त करताना, कधी त्यांच्या गेमबद्दल बोलताना दिसतात. इंडस्ट्रीतून विविध लोक स्पर्धकांबद्दल बोलत असताना आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम अभिनेत्रीनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम सुनिता म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता शिसोदेने ‘बिग बॉस मराठी’तील काही स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने तन्वी कोलतेला सुनावलं आहे, तर राखी सावंतचं कौतुक केलं आहे. प्राजक्ता घरातील स्पर्धकांबद्दल नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात….

प्राजक्ता काय म्हणाली?

प्राजक्ता सोशल मीडियामार्फत ‘बिग बॉस’मध्ये सध्या स्पर्धक खेळत असलेल्या खेळाबद्दल म्हणाली, “बिग बॉस मराठी सीझन ६ फक्त राखी सावंतमुळे सुरू आहे. तिच्यामुळेच इतर सर्व स्पर्धक दिसत आहेत. तन्वी कोलतेबाई अशा खेळत आहेत की त्यांना आधीच कळलंय की त्याच विजेत्या होणार आहेत.”

प्राजक्ता शिसोदेने काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतलीय. यामधून सुनिताची भूमिका साकारत घराघरांत पोहोचलेली प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते. इंडस्ट्रीतील अनेक घडामोडींबद्दल ती सोशल मीडियावरून तिची प्रतिक्रिया व्यक्त करत असते.

प्राजक्ता व्यतिरिक्त ‘बिग बॉस’च्या आधीच्या पर्वांमध्ये सहभागी झालेले सदस्य पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, उत्कर्ष शिंदे, अक्षय केळकर, रुपाली भोसले यांसारखे अनेक जण ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मधील स्पर्धकांबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ आता रंजक वळणावर आला असून गेल्या आठवड्यात रुचिता जामदार घराबाहेर गेली; तर या आठवड्यातही एक स्पर्धक बाहेर जाणार, त्यामुळे हळू हळू स्पर्धकांची संख्या कमी होऊन खेळ अधिक आव्हानात्मक होत आहे. या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे शनिवार-रविवारच्या भागात पाहायला मिळेल.