Vicky Kaushal at Shailesh Lodha Daughter Swara Wedding: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा लोढा हिचं लग्न जोधपूरच्या ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये पार पडलं. या शाही लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमधील अनेक सुंदर क्षणांपैकी एका खास क्षणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे अभिनेता विकी कौशलने या लग्नाला हजेरी लावली होती.

स्वराच्या लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये विकी कौशल पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश शेरवानी जॅकेटमध्ये दिसतोय. विकी कौशलने तिथे एंट्री घेतल्यावर शैलेश लोढा त्याचं स्वागत करताना दिसतात. त्याचबरोबर ते त्याची ओळख इतर पाहुण्यांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी करून देतात.

विकी कौशलने शैलेश लोढा यांचा फेटा नीट केला अन्…

या व्हिडीओ क्लिपमध्ये अनेक सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. विकी कौशल स्वतः शैलेश लोढा यांचा फेटा नीट करताना दिसतो, तसेच तो वरातीचे स्वागत करतानाही दिसतो. विकी वधू स्वरा हिची भेट घेऊन तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देताना व्हिडीओत पाहायला मिळतो. विशेष म्हणजे विकी कौशल स्वरा लोढा हिला इन्स्टाग्रामवर फॉलोही करतो. शैलेश लोढा यांचे विकी कौशलशी जवळचे संबंध आहेत.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक अतिशय भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यात लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर शैलेश लोढा आपल्या मुलीला घट्ट मिठी मारतात आणि त्यांचे डोळे भरून येतात. त्याचबरोबर स्वरा तिच्या आई-वडिलांसोबत आणि आजी-आजोबांसोबत फोटो काढताना दिसत आहे.

स्वरा लोढा हिच्या लग्नातील इतर पाहुणे

विकी कौशलबरोबरच इतर अनेक राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये रजा मुराद, राकेश बेदी, सुदेश भोसले, कुमार विश्वास, माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचा समावेश होता. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील या लग्नाला आले होते.

लग्नाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, लग्नाचे हे व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. विकी कौशलचे कौतुक करताना एका यूजरने लिहिलं, “ज्या पद्धतीने तो तिथल्या सर्वांशी गप्पा मारत होता, ते पाहून खूप छान वाटलं.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘तारक मेहता…’ मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्याबद्दल विचारलं. “जेठालाल कुठे आहेत?” असं एकाने विचारलं. “अरे, त्यांचा परम मित्रच गायब आहे,” असं एका नेटकऱ्याने लिहिलं. तर अनेकांनी स्वराच्या लग्नाबद्दल लोढा कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे.