TMKOC Fame Actress Talks About Bigg Boss Marathi Season 6 Contestent : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचीही शोमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटांतील स्पर्धक एकत्र आल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा त्यांच्यामध्ये बरेच वादविवाद होताना दिसत आहेत. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये दीपाली सय्यद, सागर कारंडे, आयुष संजीव, राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कुलते, सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे असे काही कलाकार पाहायला मिळत आहेत; तर दुसरीकडे प्रभू शेळके, राधा मुंबईकर, ओमकार सावंत, अशी इतर क्षेत्रांतीलही मंडळी पाहायला मिळत आहेत.
११ जानेवारी रोजी ‘बिग बॉस मराठी’चं ६ वं पर्व सुरू झालं. त्यानंतर दीपाली सय्यद, तन्वी कुलते, सोनाली राऊत, रुचिता जाधव, विशाल कोटियन आणि इतर काही स्पर्धकांमध्येही वाद झाले. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मधील स्पर्धकांबद्दल ‘बिग बॉस’च्या पूर्वीच्या पर्वातील काही माजी स्पर्धकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम प्राजक्ता शिसोदेनेसुद्धा आता याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता शिसोदेची प्रतिक्रिया
प्राजक्ता इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत म्हणाली, “सिंपथी, मोठ्यांचा अपमान, उगाच आवाज मोठा करून बोलणं, कारणं नसताना भांडण, अगदी छोट्या गोष्टीवरूनही भांडण, मोठे काही बोलले की, त्यांची लायकी काढण्यापर्यंतची भाषा आणि मग हे सगळं करून झालं की, मग रडायचं. सगळ्यात महत्त्वाचं कोणाविषयी आदर नाही म्हणजे बिग बॉसचा गेम का?” प्राजक्तानं या पोस्टमधून घरातील स्पर्धक कारण नसतानाही भांडत असून, एकमेकांप्रति आदर ठेवत नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता शिसोदे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तसेच कामासंबंधीत अपडेट ती यामार्फत शेअर करत असते. अलीकडेच तिनं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. त्यामध्ये तिनं सुनीता ही भूमिका साकारली होती.
