Asit Modi on Disha Vakani: अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे प्रदर्शित होतात. प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अशा मालिकांपैकी एक आहे. १८ वर्षांपासून ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

२००८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले. खळखळून हसायला लावले. यातील प्रत्येक पात्राची खासियत आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या खास पद्धती आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच मालिकेला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्या निमित्ताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सर्व कलाकार एकत्र आले होते. मालिकेचे निर्माते असित मोदीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मालिकेतील सर्वांनी मालिकेबद्दल, १८ वर्षांच्या प्रवासाबद्दल, तसेच त्यांची भूमिकेसाठी निवड कशी झाली होती, याबद्दल वक्तव्य केले. मालिकेचे निर्माते असित मोदींनीदेखील कलाकारांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. या मालिकेत दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी असे अनेक कलाकार काम करीत आहेत. याच मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीनेदेखील काम केले होते.

“दयाभाभीला शोधणं इतकं अवघड…”

दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारली होती. दिशाची ही भूमिका प्रचंड गाजली. दिशाने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर ती परत आली नाही. तसेच तिची दयाबेन ही भूमिका इतकी गाजली की, आजही प्रेक्षक दिशा मालिकेत परत येईल, अशी अपेक्षा करीत आहेत. अनेकदा प्रेक्षक मालिकेतील कलाकार किंवा निर्माते यांना दिशाच्या परतण्याबद्दल प्रश्न विचारत असतात. आता मालिकेचे निर्माते असित मोदींनी दिशा वकानीबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, दयाभाभी या पात्राबद्दलही ते बोलले आहेत. ते नेमके काय म्हणालेत, याबद्दल जाणून घेऊया…

असित मोदींनी नुकताच ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारले गेले की, दयाभाभी या पात्राबद्दल प्रेक्षक सतत विचारत असतात. हे पात्र मालिकेत पुन्हा कधी दिसणार? याबद्दल असित मोदी म्हणाले, ” तुम्हाला दयाभाभी लवकरच पाहायला मिळणार आहे. मीसुद्धा प्रयत्न करत आहे. पण, दयाभाभीला शोधणं इतकं अवघड आहे. कारण- दिशानं ज्या पद्धतीनं ते पात्र साकारलं आहे, तशी भूमिका साकारणारी अभिनेत्री सापडणं अवघड आहे. तर, आम्ही त्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधत आहोत. दयाभाभी या पात्राला मालिकेत आणण्यासाठी माझी मनापासून इच्छा आहे.”

दरम्यान, प्रेक्षकांना मालिकेत काय पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.