Tanmay Vekaria Back Pain : मालिकाविश्वामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची प्रचंड लोकप्रियता आहे. १८ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण केले. त्यातील भूमिका या त्या कलाकारांची ओळख बनल्या आहेत. त्यापैकी ‘बाघा’ची भूमिका तन्मय वेकारियाने प्रभावीपणे साकारली असून, प्रेक्षकांनी त्या भूमिकेवर भरभरून प्रेम केले. त्याची खास शैली आणि पद्धत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र, अनेक वर्षांपासून विशिष्ट पद्धतीने उभे राहून अभिनय करीत असल्याने आता पाठदुखीची समस्या निर्माण झाल्याचा खुलासा स्वतः त्याने केला आहे.

‘टीसीएक्स ऑफिशियल’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तन्मय वेकारियाने त्याचे ‘तारक मेहता…’ मालिकेतील अनुभव सांगितले आहेत. या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “बाघा हे पात्र माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. सेटवरील आनंदी वातावरण, सहकलाकारांची मदत व प्रेक्षकांकडून मिळणारे अमाप प्रेम यांमुळे प्रत्येक वेळी कामाची प्रेरणा मिळते. प्रेक्षकांमुळेच संपूर्ण टीम उत्साहाने काम करते. सेटवर हलकं-फुलकं आणि आनंदी वातावरण असतं. सेटवर एक सकारात्मकता असल्यामुळे आणखी काम करावं, असं वाटतं.”

काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करतो – तन्मय

तो म्हणाला, ” ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांची दूरदृष्टी आणि सेटवरील वातावरण यांमुळे हा शो १८ वर्षांपासून सुरू आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही प्रत्येक एपिसोडमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करीत असतो. २००८ मध्ये शो सुरू झाला होता आणि अजूनही तो सुरू आहे. आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने मालिका बघत आहेत. त्यामुळे ही बाब कलाकार आणि निर्मात्यांसाठी नक्कीच महत्त्वाची आहे. आजही लोक मालिकेच्या वेळेप्रमाणे रात्रीचे जेवण करतात. अशा एका मालिकेचा भाग होता आलं याचा खूप आनंद आहे.”

ताठ उभा राहिलो तरी पाठ दुखू लागते – तन्मय वेकारिया

पुढे तन्मयनं त्याच्या बाघा या भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “बाघाची खास देहबोली आणि उभे राहण्याची विशिष्ट शैली आहे. अनेक वर्षांपासून हे पात्र सातत्यानं साकारल्यामुळे त्याचा परिणाम आता शरीरावर झाला आहे. आता नेहमीप्रमाणे ताठ उभा राहिलो तरी पाठ दुखू लागते. पण, कॅमेऱ्यासमोर बाघाच्या भूमिकेत गेल्यानंतर हा सगळा त्रास मी विसरून जातो. अशा विशिष्ट पद्धतीनं थांबण्याचा त्रास होतोय याचा मी विचारच करीत नाही. मी फक्त ती भूमिका जगत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो.”

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या सेटवरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये गोकुलधाम या सोसायटीच्या सेटची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचे दिसत आहे. ‘गोकुलधाम सोसायटीचा सेट कायमचा हटवला जात आहे का’ असा प्रश्न उपस्थित करीत नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यावर शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी फक्त नूतनीकरण सुरू असल्याचे सांगितले आहे. असित मोदी म्हणाले, “जे काही घडत आहे, ते चांगल्यासाठीच आहे. ‘गोकुलधाम’ सोसायटीचे नूतनीकरण सुरू आहे. काही दिवसांतच तुम्हाला ती पूर्णपणे नव्या रूपात पाहायला मिळेल.”