TMKOC fame Bhavya Gandhi on Dilip Joshi and Disha Vakani: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला भव्य गांधी सध्या गुजराती चित्रपटांमध्ये काम करीत आहे. अभिनेत्याने या मालिकेत जवळजवळ १० वर्षे काम केले.

आता भव्य गांधीने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने दिलीप जोशी आणि दिशा वकानी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

दिलीप जोशी हे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करीत आहे. त्यांची जेठालाल ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. आता भव्य गांधीने दिलीप जोशी यांच्याबरोबर काम करताना त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, याबद्दल वक्तव्य केले आहे.

भव्य गांधी म्हणाला…

भव्य गांधी म्हणाला, “मला आतापर्यंत हेच समजलं आहे की, हे लोक कधी तुम्हाला कुठलीही गोष्ट बसून शिकवणार नाहीत. अमुक गोष्टी कर, करू नकोस, असे ते म्हणणार नाहीत. आपल्यंला अशा मोठ्या कलाकारांचे निरीक्षण करूनच अनेक गोष्टी शिकता येतात. जेव्हा एखाद्या सीनचं शूटिंग संपतं आणि दुसरा सीनचं शूटिंग अजून सुरू व्हायचं असतं, तेव्हा ते कशा प्रकारे बोलतात याबाबत फक्त त्यांचं निरीक्षण करीत राहिलं पाहिजे.

“सीन संपल्यानंतर ते त्यांच्या भूमिकेतून बाहेर येऊन सामान्य माणसासारखे वागतात. दिलीपसरांकडून मी अत्यंत चांगली गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे ते अॅक्शन बोलल्यानंतर भूमिकेत शिरतात आणि कट म्हटल्यानंतर ते त्या भूमिकेतून बाहेर येतात. ही गोष्ट त्यांनी शिकवली नाही. ते कधीही असे म्हणाले नाहीत की, असे करायचे असते. त्यांचे सतत निरीक्षण केल्यानंतर समजले की, सर असे करतात. जे सहकलाकार असतात, ज्येष्ठ कलाकारांकडून अशाच प्रकारे अनेक गोष्टी शिकता येतात.”

दिशा वकानी मालिकेत पुन्हा परतणार का, अशी चर्चा अनेकदा होताना दिसते. त्यावर त्याचे मत काय असे भव्यला विचारले. त्यावर तो म्हणाला, “तो त्यांचा खासगी निर्णय आहे. कारण- त्या इतर कोणत्या मालिकेतही काम करीत नाहीत. मला वाटते की, त्या त्यांच्या कुटुंबाला, मुलांना वेळ देत आहेत.”

दरम्यान, भव्य गांधी सध्या गुजराती चित्रपटांमध्ये काम करीत आहे. दिशा वकानीने मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारली होती.