Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : हिंदी मालिका विश्वातील प्रचंड लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १८ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला, भूमिकेला आणि विनोदाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असून यातील पात्र त्या कलाकारांची वैयक्तिक ओळख बनले आहेत. गोकुलधाम सोसायटी ही प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याची वास्तू बनली आहे. मात्र, सोशल मीडियावर या सोसायटीची तोडफोड सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून गोकुलधाम सोसायटी का तोडत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या सेटवरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये गोकुलधाम सोसायटीच्या सेटची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचे दिसत आहे. सेटवर कामगार काम करताना दिसत असून सर्वत्र बांबू आणि इतर बांधकाम साहित्य पडलेले दिसून येत आहे. गोकुलधाम सोसायटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ‘गोकुलधाम सोसायटीचा सेट कायमचा हटवला जात आहे का?’ असे प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर अखेर शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले ‘तारक मेहता…’ चे निर्माते?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटी कायमची हटवली जात नसून तिचे नूतनीकरण सुरू असल्याचे असित मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच आहे. गोकुलधाम सोसायटीचे नूतनीकरण सुरू आहे. काही दिवसांतच तुम्हाला ती पूर्णपणे नव्या रूपात पाहायला मिळेल. देवाकडे प्रार्थना आहे की, गोकुलधामचा हा नवा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
या व्हिडीओमध्ये असित मोदी नूतनीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करतानाही दिसत आहेत. त्यांनी इंजिनिअर्स, सुपरवायझर्स आणि कामगारांशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच काम सुरक्षितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गोकुलधाम सोसायटीचा सेट कायमचा हटवला जाणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. आता प्रेक्षकांना नव्या रूपातील गोकुलधाम सोसायटी पाहता येणार आहे. अनेक वर्षे निखळ मनोरंजनाची साक्षीदार राहिलेली ही सोसायटी नव्या रूपामध्ये पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
गोकुलधाम सोसायटीचा सेट आता नव्या रूपात
गोकुलधाम सोसायटीचा सेट आता नव्या आणि आकर्षक रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. यासाठी सेटच्या काही भागांचे नूतनीकरण आणि बदल करण्यात येत आहे. प्रेक्षकांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी हे बदल केले जात आहेत. गोकुलधाम सोसायटी पूर्णपणे बदलली जाणार नाही. मालिकेची ओळख कायम ठेवत तिचे फक्त नवे रूप तयार केले जात आहे. यापूर्वीही एकदा या सोसायटीचे नूतनीकरण करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा गोकुलधाम सोसायटी नव्या रूपात पाहता येणार आहे.
