Bigg Boss Winner Tanvi Kolte : तन्वी कोलतेने ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनच्या विजेतेपदावर नुकतंच आपलं नाव कोरलं आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. पुष्कर जोग, मेघा धाडे, निक्की तांबोळी या कलाकारांनी यंदाचा सीझन तन्वी जिंकेल असा अंदाज आधीच व्यक्त केला होता. याशिवाय राखी सावंतने सुद्धा तन्वीकडे ट्रॉफी जाणार असं आधीच सांगितलं होतं. या सगळ्यांचे अंदाज अखेर १९ एप्रिलच्या ग्रँड फिनालेला खरे ठरले असून, प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे तन्वी ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती ठरली आहे.
तन्वी कोलते शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. तिच्या भूमिकेचं नाव होतं सिंचना. यापूर्वी तन्वीने अनेक सौंदर्यस्पर्धा आणि विविध प्रोजेक्ट्समध्ये काम केलं होतं. पण, तन्वीला खऱ्या अर्थाने ओळख ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे मिळाली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्यासाठी तिने ‘लक्ष्मी निवास’मधून एक्झिट घेतली होती. सिंचनाची भूमिका अचानक का सोडली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सुद्धा पडला होता. पण, अखेर तन्वीने बिग बॉसच्या घरात स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. आता ट्रॉफी जिंकल्यावर ‘लक्ष्मी निवास’मधील कलाकारांनी तन्वीचं अभिनंदन केलं आहे.
स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, कुणाल शुक्ल यांच्यासह ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या मुख्य अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. हर्षदा यांनी तन्वीचा ट्रॉफी बरोबरचा फोटो शेअर करत यावर “So Well Deserved” असं तीन शब्दांचं कॅप्शन दिलं आहे. तन्वी खरंच ही ट्रॉफी डिझर्व्ह करते असं त्यांना याद्वारे सांगायचं आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिंचना ( तन्वी कोलतेने साकारलेली भूमिका ) ही सिद्धूची सख्खी बहीण आणि लक्ष्मीची म्हणजेच हर्षदा खानविलकर यांची धाकटी सून असते. आता ‘बिग बॉस मराठी’नंतर तन्वी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
