Bigg Boss Marathi Winner Tanvi Kolte talks about marriage : तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामुळे चर्चेत आली. संपूर्ण सीझन अभिनेत्री अनेकांच्या चर्चेचा विषय बनली होती. घरातील टास्क खेळण्याची पद्धत, स्पर्धकांबरोबरचे वाद, बाँडिंग यामुळे ती चर्चेत राहिली. घरात असताना तिने तीच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार असं म्हटलं होतं आणि शेवटी तिने ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाची ट्रॉफी पटकावली.

तन्वी कोलतेने आतापर्यंत मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ते ‘बिग बॉस’मुळेच. यामुळे ती घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअरबद्दल आणि या शोमधील प्रवासाबद्दल सांगितलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. सुरुवातीला तिच्या व अभिनेता आयुष संजीव यांच्या बाँडबद्दल बोललं गेलं. पण, नंतर त्याची शोमधून एक्झिट झाली.

तन्वी ‘बिग बॉस’मध्ये असताना तिच्या लग्नाबद्दल बोलली होती. अशातच आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिला याबद्दल विचारल्यानंतर तिने तिली तिच्या करिअरशीच लग्न करायचंच आहे असं म्हटलं आहे. तन्वीने यावेळी ती तिची आई सांगेन त्या मुलाशी लग्न करणार असंही म्हटलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

लग्नाबद्दल काय म्हणाली तन्वी?

तन्वीला मुलाखतीत घरामध्ये दोन-तीन वेळा वादादरम्यान तू काहीही बोलू नका मला बाहेर जाऊन लग्न करायचं आहे असं म्हणालेली तर यामागे काय रहस्य आहे असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “असं काही सीक्रेट वगैरे नाहीये. कारण – मला करिअरशी आधी लग्न करायचं आहे. मी पहिल्या दिवसापासून तिथे म्हटलं होतं की मी गेम शोमध्ये अफेअर वगैरे करणार नाही, लव्ह अँगल देणार नाही.”

तन्वी पुढे म्हणाली, “तीन महिन्यात कोणालाच प्रेम होऊ शकत नाही. मला तर कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माझं ठरलेलं की मी जाणार तर एकटी जाणार, एकटी बाहेर पडणार, खेळून बाहेर पडणार आणि मी कायम म्हणत आलीये की माझी आई माझ्यासाठी मुलगा बघणार. हो मी अशीच आहे. मला फटकळ, बोल्ड बिनदास्त म्हणतात पण, मी खूप जुन्या विचारांची आहे. माझी आई माझ्यासाठी ज्या मुलाची निवड करणार त्याच्याशीच मी लग्न करणार एवढंच. बाकी काही नाहीये.”