Tanvi Kolte Instagram Missing: सध्या सोशल मीडिया हे अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया मनोरंजनाचे साधन म्हणून वापरता येते. तसेच त्यावर डान्स व्हिडीओ, गाणी, दैनंदिन जीवनातील काही क्षण अशा अनेक गोष्टी शेअर करता येतात.

अनेकजण त्याचा बिझनेससाठी वापर करतात. कलाकारही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये असते. व्यावसायिक गोष्टींबद्दल सांगण्यासाठी, मालिका, चित्रपट, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा बऱ्याचजणांचे अधिकृत अकाउंट अचानक दिसणे बंद होते, यामुळे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असणाऱ्या वापरकर्त्याचे नुकसान होऊ शकते.

तन्वी कोलतेचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब

आता अभिनेत्री तन्वी कोलतेचे इन्स्टाग्राम अकाउंट सोशल मीडियावरून गायब झाले आहे. तिच्या फॅन पेजेसने यासंदर्भात अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. तसेच, तन्वीचे अकाउंट लवकर परत यावे अशी आशा व्यक्त केली आहे. तन्वीचे सोशल मीडियावर जवळजवळ दोन लाख फॉलोअर्स होते.

तन्वी सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचा चाहतावर्ग वाढल्याचे दिसले होते. तसेच, इन्स्टाग्रामवरही फॉलोअर्सची संख्यादेखील वाढली होती. मात्र, तिचे अकाउंट अचानक दिसेनासे झाल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते चिंतेत पडल्याचे कमेंट्सवरून पाहायला मिळत आहे.

तन्वीने बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासून स्वत:ची जागा निर्माण केली आहे. तिचा खेळ, योजना याची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. याबरोबरच तिचे अनेक डायलॉगही लोकप्रिय होताना दिसतात. अनेकजण त्यावर मीम, रील्स बनवताना दिसतात.

तन्वी अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे, भांडणांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकते. अनेक कलाकारही तिच्या खेळावर व्यक्त होताना दिसतात. जेव्हा ती चुकते त्यावेळी रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर कानउघाडणीदेखील करतो. तसेच, जेव्हा ती योग्य रितीने खेळते तेव्हा तो तिचे कौतुकही करतो.

बिग बॉसच्या घरात सध्या काही गट पडले आहेत. तन्वी काटा गँगमध्ये आहे. या गँगमध्ये राकेश, तन्वी, दीपाली सय्यद आणि प्रभू शेळके असल्याचे दिसते. याबरोबरच, प्रभू आणि तन्वी यांच्यातील बॉण्डिंगही लक्ष वेधून घेते.

बिग बॉसमध्ये येण्याआधी तन्वी कोलते झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सिंचना ही भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली होती.

काही दिवसांपूर्वी फूड ब्लॉगर दीपिका आणि प्रसाद वेदपाठक यांचीही काही अकाउंट अचानक दिसणे बंद झाले होते. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांचे एक अकाउंट परत मिळाल्याचे त्यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितले. आता तन्वी कोलतेचेदेखील इन्स्टाग्राम अकाउंट परत येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, बिग बॉसच्या खेळात पुढे काय होणार, तन्वी शेवटपर्यंत टिकून राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.