Tanvi kolte on Being Called Fake: तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली. ती बिग बॉसच्या घरात असतानादेखील अनेकदा तिच्यावर टीका झाली. तिच्या खेळावर प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होते. अनेकांनी ती या घरात खोटं वागत आहे असेही म्हटले.
बिग बॉसच्या घरात ती मुखवटा घालून खेळत असल्याचे अनेक प्रेक्षकांनी म्हटले. विशेष म्हणजे, तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली. त्यानंतरही अनेकांनी तिच्यावर टीका केली. आता एका मुलाखतीत तन्वी कोलतेने यावर वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
“जे मला म्हणत आहेत की मी मुखवटा घालून होते…”
तन्वी कोलतेने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, जेव्हा रेवा एलिमिनेट झाली तेव्हा तू म्हणाली होतीस की खोटं बोलणारे, धक्काबुक्की करणारे राहिले आणि चांगली व्यक्ती घराबाहेर गेली आहे, त्यावरून चर्चा झाली होती. तू मुखवटा घालून वावरतेस असे म्हटले जात होते. याबद्दल तुझं मत काय आहे? यावर ती म्हणाली, “जे मला म्हणत आहेत की मी मुखवटा घालून होते, त्यांना मला सांगावसं वाटलं की, प्लीज पहिल्यापासून एपिसोड बघा, कारण तन्वी कोलते जेव्हा जेव्हा बोलली आहे, तेव्हा तेव्हा धडधडीत बोलली आहे. कधी असा विचार केला नाही की मी बोलले तर समोरचा मला काय बोलेल.”
तन्वी असेही म्हणाली, “माझं असं होतं की मला आता जे वाटतंय, जे मनात आहे, ते मला बोलायचे आहे. माझा हा स्वभावच नाही की पोटात एक आहे आणि ओठावरती वेगळं आणतेय. त्यांना ज्या पद्धतीने घ्यायचं होतं, त्यांनी ते त्या पद्धतीने घेतलं आणि माझ्याबद्दल अशा प्रकारची नकारात्मक वाक्य बोलली गेली की हिला जनतेचा निर्णय मान्य नाही का, जनतेने आमच्यावरती प्रेम दाखवलं हे हिला पटलं नाही का? प्रत्येक भाऊच्या धक्क्यानंतर जेव्हा मी सुरक्षित व्हायचे, तेव्हा मी जनतेचे आभार मानायचे. जनतेचा निर्णय मान्य असायचा. इथून बाहेर गेले तर मी असं समजेन की माझा गेम तुम्हाला आवडला नाही. मी जी कविता केली होती, त्यावर ते म्हणत होते की, जनतेचा निर्णय होता तो तुला आवडला नाही, मग तूच पात्र नाहीस, हे घरामध्ये चालू झालं होतं. माझं असं होतं की तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही बोला; मी मनापासून कविता केली होती.”
“मी विशालला बऱ्याचदा म्हणाले आहे की, तू माणूस म्हणून मला पटतोस किंवा नाही याबद्दल मी बोलत नाही. पण, तू ज्या प्रकारे खेळलास ते मला आवडत नाही. तो माझा गेम नाही. म्हणून कदाचित आपलं पटत नाही. आता एवढं सगळं बोलून मला खोटारडी म्हणायचं असेल किंवा माझ्याबद्दल नकारात्मकच बोलायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे, तो त्यांचा गेम होता, जो ते छान प्रकारे खेळले. हा माझा गेम होता”, असे म्हणत तन्वीने तिचे मत सांगितले.
