Tanvi Kolte on Ruchita Jamdar smoking allegations: तन्वी कोलते सध्या मोठ्या चर्चेत आहे. नुकतीच ती ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची विजेती झाली आणि राकेश बापट हा उपविजेता ठरला. विशाल कोटियनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

बिग बॉसच्या सहाव्या पर्वात दोन ग्रुप प्रामुख्याने दिसले. टोळी आणि काटा या दोन्ही गटांनी वेळोवेळी लक्ष वेधून घेतले. टोळीमध्ये विशाल कोटियन, रोशन भजनकर, रुचिता जामदार, राधा पाटील आणि सुरुवातीला तन्वी कोलते आणि काही काळापर्यंत अनुश्री माने हे स्पर्धक दिसले होते. त्यानंतर तन्वी कोलते या गटातून बाहेर पडली. काही दिवसांनंतर अनुश्री मानेही या गटातून बाहेर पडली.

तर काटा गँगमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, प्रभू शेळके व दीपाली सय्यद हे स्पर्धक होते. या दोन्ही गटांमध्ये सतत वाद, भांडणे पाहायला मिळाली. टास्कदरम्यानही त्यांच्यात भांडणे झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे बाहेर पडल्यानंतरही काही स्पर्धकांनी घरात असलेल्या स्पर्धकांबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्या खेळाबद्दल केलेली वक्तव्ये चर्चेत आली होती.

“बघितलं आहे का?”

आता बिग बॉसची विजेती झाल्यानंतर तन्वी कोलतेने ‘अल्ट्रा बझ मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले गेले की, तन्वी खूप सिगारेट ओढते आणि त्याचा वास माझ्या अंगावर आला म्हणून मी तिला खरकटी म्हणाले, असे रुचिता म्हणाली होती. तर नेमकं काय घडलं होतं? त्यावर तन्वी म्हणाली, “धूम्रपान ही वेगळी गोष्ट आहे आणि खरकटी म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे. खरकटी का म्हणाली याचं समर्थन करायचं म्हणून एखाद्यावर स्मोकिंगचा आळ टाकणं कितपत योग्य आहे? जर आपण आळ टाकतोय, तर ते बाहेर तसं आहे का? दिसली आहे का? किंवा मी खरंच धूम्रपान करते का, हे आपण बघितलं आहे का? मला असं वाटतंय की, एका मुलीनं मुलीचा आदर केला पाहिजे. बाहेरच्या समजातसुद्धा एकमेकांना धरून चाललं पाहिजे.”

पुढे ती म्हणाली, “मी बिग बॉसच्या घरात खेळत होते. ती बाहेर पडली. मला माहीत नाही की, तिने असे आरोप का केले? मी स्मोकिंग करीत नाही, असं जर मी म्हटलं, तर ज्या लोकांना तिचं म्हणणं पटलं आहे, त्यांचं मत परिवर्तन मी आता करू शकत नाही. मी स्मोकिंग करीत नाही, असं म्हणून मी त्यांचा दृष्टिकोन बदलू शकत नाही.”

“मला असं वाटतं की, आपण बाहेर पडलोय, तर आपण जिंकू शकलो नाही म्हणून आपण एखाद्याला हरवायचा प्रयत्नही केला नाही पाहिजे. मी तिच्या जागी असते, तर मी असं केलं नसतं. बिग बॉस सगळेच खेळले, सगळ्या प्रकारे खेळले. जर आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलू शकत नसेल, तर वाईटही बोललं नाही पाहिजे. मला कोणाबद्दलही काही वाटत असू दे, मी बिग बॉसचा गेम आतच सोडून आली आहे. मला कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही. मला तिच्याबद्दलही वाईट काहीच बोलायचं नाही. तिनं ते विधान केलं, त्यामध्ये ती यशस्वी ठरली किंवा नाही, याबद्दलही मला काही बोलायचं नाही. मला पाडण्याचे सगळीकडून प्रयत्न चालू होते. त्यानं काहीच फरक पडला नाही. ज्याचं माझ्यावर मनापासून प्रेम होतं, त्यांनी प्रेम दाखवलं आणि मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली”, असे म्हणत तन्वीने तिचे मत मांडले.