Tanvi Kolte Prabhu Shelke Raksha Bandhan: मराठी कलाविश्वातील कलाकारांनी रक्षाबंधन सण उत्साहाने साजरा केला. कलाकारांनी त्यांच्या बहिणींबरोबर आणि भावंडांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. मराठी बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती तन्वी कोलतेने खास सेलिब्रेशन केले. तिने बिग बॉसमधील एका स्पर्धकाला भाऊ मानले असून त्यांनी रक्षाबंधन साजरे केले आहे.
तन्वी कोलतेने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधन साजरे करताना व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिने ‘बिग बॉस मराठी ६’ चा एक अत्यंत चर्चेत असलेला स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर प्रभू शेळकेला राखी बांधली आहे. तन्वीने अगदी मायेने प्रभू शेळकेला राखी बांधली असून यावेळी तिने भावाला खास गिफ्टसुद्धा दिले.
तन्वीने बहिणीच्या हक्काने प्रभूला मारले फटके
यावेळी तन्वीने निळ्या रंगाचा ड्रेस स्टाईल केला होता. पारंपरिक पद्धतीने राखी बांधल्यानंतर प्रभूने तन्वीला ओवाळणी दिली. मात्र, ती न घेता तन्वीने तेच पैसे प्रभूच्या बॅगेमध्ये टाकले. तसेच भावाला तन्वीने गिफ्ट दिले. राखी बांधून झाल्यानंतर मोठ्या बहिणीच्या नात्याने तन्वीने प्रभूला नीट पाया पडायला सांगितले. तसेच पाठीवर तन्वीने बहिणीच्या हक्काने फटके दिल्याचे दिसून आले. तन्वी कोलते व प्रभू शेळकेचे मस्ती घालत साजरे केलेले हे रक्षाबंधन चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.
नेटकऱ्यांनी केलं तन्वीचं कौतुक
सोशल मीडियावर रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तन्वी व प्रभू यांच्या बहीण-भावाच्या नात्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “बिग बॉसमध्ये सुरू झालेलं हे नातं प्रभू व तन्वीनं खरंच जपून ठेवलंय.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “गरिबीतून पुढे आलेले असेच नाती जपत असतात आणि तेच जपणं लोकांना खोटं वाटतं, पण खरं तर तसं नसतं.” आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं, “तन्वी जशी बिग बॉसच्या घरामध्ये होती तशीच ती बाहेरसुद्धा आहे. तन्वीच खरी बिग बॉस जिंकण्याची हक्कदार होती.” तन्वी कोलते व प्रभू शेळकेचं हे बहीण-भावाचं नातं असंच पुढे कायम राहावं, अशा शुभेच्छा नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, बिग बॉसपूर्वी तन्वी कोलतेने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिंचना ही भूमिका साकारली होती. पण, तिला खरी ओळख बिग बॉस मराठीने दिली. स्पष्टवक्तेपणा व जबरदस्त खेळ यामुळे तन्वी कोलते विजेती ठरली. काही दिवसांपूर्वी तिचे ‘चाकरी’ हे रोमँटिक म्युझिक अल्बम साँग रिलीज झाले आहे.
