Tanvi Kolte reacts on Sonali Raut Allegations about hygiene in Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ चा महाअंतिम सोहळा पार पडला असला तरी या शोचीच चर्चा आहे. अभिनेत्री सोनाली राऊतने बिग बॉसच्या घरात प्रचंड अस्वच्छता असून तिथे उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर अस्वच्छतेमुळे तिला ‘स्केबीज’ हा त्वचेचा आजार झाल्याचंही तिने सांगितलं. आता यावर विजेती तन्वी कोलतेने मौन सोडलं असून सोनालीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
‘बिग बॉस मराठी सीझन ६’ च्या ग्रँड फिनालेच्या अवघ्या दोन दिवस आधी, अभिनेत्री सोनाली राऊतने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत ठेवलं जातंय, असा दावा तिने केला होता. घरातील अस्वच्छता, घाणीमुळे तिला ‘स्केबीज’ (खरुज) हा त्वचेचा आजार झाला, असं सोनाली राऊतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सांगितलं.
सोनाली राऊतचे आरोप नेमके काय?
व्हिडीओत सोनालीने म्हटलं की किचनमध्ये उंदीर फिरत होते आणि तिथलं किराणा सामान खायचे. तेच उंदरांचे उष्टे अन्न स्पर्धक शिजवून खायचे. जेवणात झुरळे आढळल्याचा आरोपही तिने केला. शिक्षेचा भाग म्हणून १७ स्पर्धकांना एकच बाथरूम वापरायला दिलं जायचं. तिथेच लोक धूम्रपान करायचे आणि जेवायचे. इतकंच नाही तर बाथरूममध्ये चिकनचे तुकडे, अंड्यांची टरफलं आणि मेलेले उंदीर पडलेले असायचे. चादर आणि टॉवेलची कमतरता असल्याने स्पर्धकांना एकमेकांचे टॉवेल, नॅपकिन आणि बेडशीट वापरावे लागत होते. स्पर्धकांना पुरेसं जेवण, झोप मिळत नव्हती. त्याचबरोबर अस्वच्छतेचा त्रासही होता.
सोनाली राऊतच्या वादग्रस्त दाव्यांबद्दल तन्वी कोलते काय म्हणाली?
सोनालीने केलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना तन्वी कोलते म्हणाली, “यापैकी काहीही खरं नाही. मी त्या घरात १०० दिवस घालवले आहेत आणि मला काहीही झालेलं नाही. इतरही अनेक जण तिथे १०० दिवस होते, पण ती (सोनाली) त्या घरात फक्त दोन आठवडे राहिली. इतक्या कमी वेळेत एवढं सगळं कसं घडू शकतं? मला तिथे कधीही काहीच चुकीचं आढळलं नाही.”
तन्वी पुढे म्हणाली, “१०० दिवस राहणं आणि १४ दिवस राहणं यात फरक आहे. ती जे काही सांगतेय, तसं काहीच मला त्या घरात जाणवलं नाही. मला सोनालीला काहीही म्हणायचं नाही, ती तिला हवं ते बोलत राहील. आम्हाला तिथे खूप चांगलं ठेवण्यात आलं होतं. ‘बिग बॉस’ने आम्हाला प्रेमाने ठेवलं आणि आम्हाला चांगलं जेवणही दिलं.”
तन्वी कोलतेचे भविष्यातील प्लॅन्स
‘बिग बॉस मराठी ६’ जिंकल्याचा करिअरला कसा फायदा होईल, याबद्दल तन्वी म्हणाली, “जेव्हा कोणी बिग बॉस जिंकतं, तेव्हा विजेत्याला खूप काम मिळतं. मलाही चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर मिळतील अशी आशा आहे. माझ्याकडे जे काही चांगलं काम येईल, ते मी करेन. मला नवीन प्रोजेक्ट्स मिळाले तरच माझी प्रगती होईल आणि मला वाटतं की या विजयामुळे माझी प्रगती होईल.”
तन्वीने पुढे ‘बिग बॉस हिंदी’ मध्ये सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली. ती म्हणाली, “मला इतर रियालिटी शोमध्ये सहभागी व्हायला आवडेल. मला या शोमुळेच ओळख मिळाली आहे. जर मला ‘बिग बॉस हिंदी’ची ऑफर मिळाली, तर मी ती नक्कीच स्वीकारेन. इतर शोमध्ये काम करायलाही मला आवडेल.”
