Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वामुळे अभिनेत्री तन्वी कोलते घराघरांत लोकप्रिय झाली. यंदाच्या सीझनची ती विजेती ठरलीये. खरंतर, या शोमध्ये सहभागी होण्याआधी तिला फारसं कुणीही ओळखत नव्हतं. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे ती थोडीफार चर्चेत होती पण, तन्वीला खऱ्या अर्थाने ओळख ‘बिग बॉस मराठी’मुळे मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तन्वीने इंडस्ट्रीमधील सुरुवातीचे दिवस, याचबरोबर कोणाकडून चुकीचे मेसेज आले तर, त्याठिकाणी जाणं कटाक्षाने टाळलं याबाबत सविस्तरपणे सांगितलं आहे.

तन्वी कोलते ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “इंडस्ट्रीत जेव्हा मी आले तेव्हा सुरुवातीला मला खूप भीती होती. कारण, माझ्या कोणाशी ओळखी नव्हत्या. हळुहळू माझ्या काही कलाकारांबरोबर ओळखी झाल्या, त्यांच्याकडून कास्टिंग, ऑडिशन या सगळ्या गोष्टी समजल्या. अनेकदा एखाद्याशी बोलताना असंही वाटायचं की, काहीतरी चुकतंय…हे माझ्याशी असं का बोलत आहेत? कदाचित ही मालिका मी करायला नको. मला एखाद्याबद्दल असं काही जाणवलं, तर मी तिथूनच नकार द्यायला सुरुवात करायचे. आधी मी गावी राहायचे, ज्यावेळी मोबाईलवर ऑनलाइन पाठवलेली ऑडिशन ओके व्हायची तेव्हाच मी मुंबईत यायचे. त्यामुळे कास्टिंग दिग्दर्शक वगैरे मला असे फार कधी भेटलेच नाहीत. मी गावीच ऑडिशन द्यायचे…सगळं फायनल झालं की, मुंबईत यायचे. असा माझा एकंदर प्रवास होता.”

तन्वी पुढे सांगते, “जर मला कोणी बोललं की, आज संध्याकाळी भेटायला येऊ शकतेस का? प्रोजेक्टसंदर्भात बोलायचंय. त्यावेळी माझा रिप्लाय असाच असायचा की, सॉरी सर पण मी आता गावी आहे. मला येता येणार नाही. मुलींना तो एक सेन्स असतो…त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय हे मुलींना पटकन समजतं. तसंच मलाही पटकन समजून जायचं की, कुछ तो गडबड है, इथे काहीतरी चुकीचं होऊ शकतं.”

“मला आता मुंबईत राहून भाडं भरायचंय, माझं काही होत नाहीये…अशी परिस्थिती सुदैवाने कधीच नव्हती. मी गावी राहूनच सगळं करायचे. मी मम्मीशी सगळं बोलूनच करायचे, त्यामुळे ती पण मला खूप गाइड करायची. पण या वाटेवरती प्रत्येक जागी कोल्हे-भामटे असे आपल्याला भेटतच असतात. पण, दुर्लक्ष करायचं की एंटरटेन करायचं हे आपल्यावरती असतं. मी मोस्टली अशा लोकांकडे दुर्लक्षच केलं.” असं तन्वी कोलतेने सांगितलं.