‘बिग बॉस मराठी सीझन ६’ च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. तिने अंतिम फेरीत लोकप्रिय अभिनेता राकेश बापटचा पराभव केला. या विजयानंतर तन्वीने कबूल केलं की, राकेश बापटसारख्या मोठ्या स्टारसमोर उभं असताना तिला पराभवाची भीती वाटत होती.
तन्वी कोलतेने रविवारी ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ चे विजेतेपद पटकावले. तिने अंतिम फेरीत अभिनेता राकेश बापटचा पराभव केला. तिला मानाची ट्रॉफी, १५ लाख रुपये रोख, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि १० लाख रुपयांचे डायमंड ज्वेलरी व्हाउचर मिळाले. विजयानंतर तिने आपल्या प्रवासाबद्दल भाष्य केलं.
मेघा धाडेनंतर तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी’ जिंकणारी दुसरी महिला ठरली. “हा प्रवास खूपच छान होता. मी या सीझनमध्ये आल्यावर मी जिंकेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण मी रोज सकाळी ट्रॉफी जिंकलेय, असं मेनिफेस्ट करायचे. माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं,” असं तन्वी कोलते स्क्रीनशी बोलताना म्हणाली.
राकेश बापटबद्दल तन्वी कोलते म्हणाली…
तन्वी आणि राकेश बापट हे या सीझनचे शेवटचे टॉप २ स्पर्धक होते. त्या क्षणाबद्दल तन्वी म्हणाली, “जेव्हा मी राकेश बापटबरोबर उभी होते, तेव्हा एका क्षणी मला असं वाटलं की मी हरू शकते. माझा फायनलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मी मनापासून खेळले, म्हणूनच प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला इथवर आणलं. जर लोकांनी शो पाहिला असेल तरच ते माझ्यासाठी वोट करतील, असं मला वाटत होतं. कारण राकेश बापटला कोण ओळखत नाही? त्यामुळे मला थोडी भीतीही वाटत होती. राकेश मला म्हणाला होता की लोक प्रेमापोटी मतं देतात. जर तो जिंकला असता तरी तो माझ्या भावासारखाच आहे, मला आनंदच झाला असता; पण ट्रॉफी न मिळाल्याचं थोडं दुःखही झालं असतं.”
वडिलांची खूप आठवण आली – तन्वी कोलते
ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी काहीच बोलली नव्हती? याचं कारण सांगताना ती म्हणाली, “मी त्या वेळी खूप भावूक झाले होते. ती भावना मी शब्दांत मांडू शकत नाही. ट्रॉफी हातात आल्यावर मला बोलताही येत नव्हतं. माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण झालं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. खूप छान वाटलं. त्या दिवशी मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. आम्ही दोघांनी मिळून हे स्वप्न पाहिलं होतं. हा प्रवास कठीण होता, पण मी तो पूर्ण केला, याचा मला अभिमान वाटतो.”
दरम्यान, १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर तन्वी कोलते विजेती ठरली. विशाल कोटियन, दिपाली सय्यद, अनुश्री माने व राकेश बापट या चार स्पर्धकांना मागे टाकत तिने ट्रॉफी पटकावली. सध्या तन्वीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
