Tarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Actress Exit : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. गेली १७ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण, यादरम्यान मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी एक्झिट घेतली आहे. अशातच आता अजून एका पात्राची मालिकेतून एक्झिट झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार गेल्या काही वर्षांपासून एक्झिट घेताना पाहायला मिळत आहेत. अनेकांची मालिकेत रिप्लेसमेंट झाली, तर काही मालिका सोडल्यानंतर निर्माते असीत कुमार मोदी यांच्याबद्दल तक्रार करतानाही दिसतात. अशातच आता यामधून अजून एका कलाकाराची एक्झिट झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील महिला मंडळ यांच्याबरोबर अनेकदा पाहायला मिळालेली अभिनेत्री प्राजक्ता शिसोडे हिने यामध्ये सुनीता ही भूमिका साकारलेली, जी गोकुळधाममध्ये भाजी विकायला यायची असं पाहायला मिळायचं. पण, आता तिने या मालिकेचा निरोप घेतला असून याबद्दल स्वत: पोस्ट करत तिने ही माहिती शेअर केली आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावरून मालिका सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. यावेळी तिने जिथे अपमानास्पद वागणूक मिळते तिथे काम करायचं नाही, असं सांगितलं आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने म्हटलं की, “ज्यांना तुमच्या भावनांची किंमत नाही, त्यांच्याबरोबर तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून काम करू नये.” यावेळी तिने पुढे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे आभार मानले आहेत आणि ती महिला मंडळला मिस करेल असंही म्हटलं आहे.

प्राजक्ताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सुनीता ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. यासह तिने ‘आई तुळजा भवानी’, ‘मटका किंग’ यांसारख्या कलाकृतींमध्येही काम केलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ती यामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.