Shivani Sonar on Abhidnya Bhave: ‘तारिणी’ ही मालिका सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेत शिवानी सोनार तारिणी ही भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री अभिज्ञा भावे कौशिकी या भूमिकेत दिसत आहे.
अभिज्ञा भावेबद्दल शिवानी सोनार म्हणाली…
आता शिवानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिज्ञाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अभिज्ञाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले, “काही माणसं आपल्या आयुष्यात नकळतपणे येतात. साधारण दीड दोन वर्षांपूर्वी माझा भाऊ दादरमध्ये फिरत असताना त्याने अभिज्ञाला पाहिलं. मला भेटला तेव्हा मला म्हणाला, दीदी, अगं ती नाही का? झी मराठीची खलनायिका, जी सगळ्या शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारते, ती आज मला दादरमध्ये दिसली होती.”
पुढे शिवानीने लिहिले, “तारिणी मालिकेत कौशिकीची भूमिका अभिज्ञा भावे करतेय हे कळलं, जिच्याबरोबर मी रुम शेअर करणार होते. इकडच्या तिकडच्या गोष्टींपासून व्हॅनिटी व्हॅनमध्ये गप्पांची सुरुवात होते. त्या गप्पा कधीच संपत नाहीत. तिने सेटवरची मेकअप रुम सजवली, सेटला तिने जवळपास घर करून टाकलं. मी तिला १२ मार्चला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेताना पाहिलं. तिच्या गेल्या खूप वर्षांच्या कष्टाचं चीज होताना पाहिलं.”
शिवानीने अभिज्ञाबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल लिहिले, “मला कधीच वाटलं नव्हतं की ती झी मराठीची खलनायिका, माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त सकारात्मक व्यक्ती असेल. पण ही एकमेव व्यक्ती आहे, जी एकाच वेळेला माझ्याबरोबर लहानही असते, माझ्यापेक्षा मोठीही असते आणि त्याचवेळी माझ्या वयाचीसुद्धा असते. अभिज्ञा तुला कल्पना नाही की तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस.”
पुढे तिने अभिज्ञाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इतकी चांगली माणसं आयुष्यात पाठवल्याबद्दल देवाचे आभारही मानले. शिवानीच्या या पोस्टवर अभिज्ञाने कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. तिने लिहिले, “वाढदिवसाला रडवलंस. तुझ्यासारख्या अंतर्मुख स्वभावाच्या मुलीकडून हे अनपेक्षित होतं. तू मला भेटलीस याचा आनंद आहे. तू कायम माझ्या आयुष्यात असशील माझी तारिणी”, असे लिहित अभिज्ञाने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनीदेखील त्यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

तारिणी या मालिकेबद्दल बोलायचे तर या मालिकेत तारिणी ही स्पेशल क्राइम युनिटची बॉस आहे. त्यामध्ये केदारही आहे, तर कौशिकी ही पत्रकार आहे. या मालिकेत विविध गोष्टी, गुन्हे घडताना दिसतात, तारिणी त्या गुन्ह्यांचा शोध घेताना दिसते. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.
