Zee Marathi Tarini Serial Promo : तारिणी आणि केदारने केवळ मिशनचा एक भाग म्हणून लग्नगाठ बांधलेली असते. पण, प्रत्यक्षात केदारचं तारिणीवर जीवापाड प्रेम असतं. मात्र, हे प्रेम आपल्या बॉससमोर त्याला व्यक्त करता येत नसतं. तर, दुसरीकडे तारिणी तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा रेवाला सांगते. यातील बरेच गुण केदारमध्ये असतात. तो तारिणीला समजून घेत असतो, तिच्या आजीचा तेवढाच आदर करतो, बाईपण जपणारा आणि सर्वांचा आदर करणारा असा केदारचा स्वभाव आहे. याच गुणांमुळे तारिणी आता केदारवर इम्प्रेस होणार आहे.
तारिणीच्या मनात हळुहळू केदारबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल. तिलाही केदारवर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल. पण, यादरम्यान तारिणी-केदारला एका मोठ्या मिशनवर जायचं आहे. रेवा युवराजला भुरळ घालून त्याच्याकडून रेव्ह पार्टीची माहिती मिळवून घेते. आता टीम तारिणी या पार्टीच्या लोकेशनवर अचानक छापा मारणार आहे.
रेव्ह पार्टीचा आणि ऑर्गन ट्रॅफिकिंग रॅकेटचा ( मानवी अवयव तस्करी ) सूत्रधार गुलाब देखील या पार्टीत सहभागी असतो. गुलाबला रंगेहाथ पकडण्याची मोठी संधी टीम तारिणीकडे असते. पण, गुलाबची सगळी माणसं गोळीबाराला सुरुवात करतात. या चकमकीदरम्यान तारिणीला केदार आपल्याला कसा सांभाळून घेतोय, आपली कशी काळजी घेतोय…आपल्यावर येणारे प्रत्येक वार आधी केदार झेलतोय याची जाणीव होते. इतक्यात केदारवर गुलाबने बंदूक रोखल्याचं तारिणीला दिसतं, ती लगेच मध्ये येते आणि गोळी आपल्या अंगावर झेलते.
तारिणीला गोळी लागल्यामुळे केदार तिला लगेच सावरतो. यावेळी पहिल्यांदा तो तिला ‘बॉस’ ऐवजी ‘तारिणी’ म्हणून हाक मारणार आहे. तारिणी “आय लव्ह…” म्हणत असताना तिची शुद्ध हरपते. यावेळी केदारला अश्रू अनावर होतात. तो आपल्या तारिणीला वाचवू शकेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाब पकडला जाणार की तो टीम तारिणीच्या हातून निसटणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना समजणार आहे.
‘तारिणी’चा रोमँटिक आणि तेवढाच थ्रिलर प्रोमो पाहून प्रेक्षकही भावुक झाले आहेत. “आतापर्यंतचा बेस्ट प्रोमो”, “स्लॉट लीडर सोडा…नंबर वन मालिका, नंबर वन प्रोमो”, “सर्व मालिकांचे प्रोमो एका बाजूला आणि तारिणीचा प्रोमो एका बाजुला One Side”, “फायनली तारिणीला तिचा ग्रीन फ्लॅग मिळाला…पण गोळी लागलीये”, “या दोघांची केमिस्ट्री कमाल आहे”, “झी मराठीला मानलं…जबरदस्त प्रोमो आहे तारिणी टीमला शुभेच्छा”, “डोळे पाणावले…पुढे काय होणार यासाठी उत्सुकता” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, येत्या जून महिन्यात प्रेक्षकांना हा जबरदस्त सीक्वेन्स ‘तारिणी’ मालिकेत पाहायला मिळेल. ही मालिका रात्री ९:३० ते १०:१५ या वेळेत प्रसारित केली जाते.
